Maharashtra Rain Alert
मुंबई: राज्यातील काही भागांमध्ये १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो. १८ ते २० मार्च दरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीच्या कामांचे नियोजन करावे आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत, असेही सांगण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबईच्या हवा प्रदूषणात वाढ झाली असून यामुळे शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 'मध्यम' श्रेणीत नोंदला जात आहे. समीर अॅपच्या नोंदीनुसार, गुरुवारी शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 'समाधानकारक' श्रेणीत नोंदला गेला असला तरीही शहरातील सर्वाधिक प्रदूषित हवा कुर्ला येथे नोंदवली गेली. येथील हवा गुणवत्ता निर्देशांक २८४ म्हणजेच 'वाईट' श्रेणीत होता.
मुंबई शहर आणि उपनगरांतील नागरिकांची काही दिवसांपूर्वी धुरकट वातावरणातून सुटका झाली होती. मात्र, बुधवारपासून शहरातील धुरकट वातावरणात पुन्हा वाढ झाली आहे. धुरकट वातावरणाचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवरही होत असतो. या नैसर्गिक कारणासोबतच वाहतूक प्रदूषण, बांधकाम प्रकल्प, शहरात सुरु असणारी विकास कामे या मानवनिर्मिती कारणांचा परिणामही हवेच्या गुणवत्तेवर होत असतो. सध्या मुंबईत उन्हाचा तडाखाही वाढला असून त्यात आता पुन्हा हवा प्रदूषणात वाढ झाल्याने मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
समीर अॅपच्या नोंदीनुसार, पवई येथील हवा गुणवत्ता निर्देशांक 'मध्यम' श्रेणीत म्हणजे १०१ इतका होता. वांद्रे कुर्ला संकुल १२४, बोरिवली पूर्व १०३, चकाला (अंधेरी पूर्व) १२३, मालाड पश्चिम १०८, भायखळा -१०१, देवनार येथील हवा गुणवत्ता निर्देशांक १०५ इतका होता.