पुणे / मुंबई : विशेष सघन मतदारयादी पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत महाराष्ट्रातील एक कोटी २२ लाख २४ हजार ७ मतदारांच्या नोंदी पडताळणीसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. या मतदारांना राज्य निवडणूक कार्यालयाकडून लवकरच नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
नोटीस मिळाल्यानंतर संबंधित मतदारांना आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन सादर करण्याची तसेच काही प्रकरणांत व्हॉटस्ॲपद्वारे प्रतिसाद देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या १.२२ कोटी मतदारांमध्ये ६२ लाख ४८ हजार २८१ मतदारांच्या नोंदींमध्ये नातेवाईकांच्या तपशिलाबाबत विसंगती आढळल्या आहेत, तर ५९ लाख ७५ हजार ७२६ मतदारांची नावे मागील मतदार यादीतील संबंधित नोंदींशी जुळवता आलेली नाहीत. मात्र, या मतदारांना अपात्र ठरवण्यात आलेले नसून, त्यांची नोंद पुढील पडताळणीसाठी चिन्हांकित करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या विनंतीनुसार नोटिसा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये देण्यात येणार आहेत. न्यायव्यवस्था, लोकप्रतिनिधी तसेच पत्रकारिता, कला, संस्कृती, क्रीडा आणि सार्वजनिक सेवेशी संबंधित प्रमुख व्यक्तींच्या नोंदींमध्ये विसंगती असल्यास त्यांच्याशी संबंधित अधिकारी प्रथम थेट संपर्क साधतील.
इतर मतदारांना मोबाईल क्रमांक उपलब्ध असल्यास व्हॉटस्ॲपसारख्या माध्यमातून प्राथमिक सूचना पाठवली जाऊ शकते. आवश्यक कागदपत्रे अपुरी असल्यास संबंधित मतदाराला निवडणूक अधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष सुनावणीसाठी उपस्थित राहावे लागेल. कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यासाठी मतदारांना इपिक (इपीआयसी) क्रमांक किंवा नोटीस संदर्भ क्रमांकाचा वापर करता येणार आहे.
४ नोव्हेंबरला अंतिम यादी
नोटीस व त्यावरील कार्यवाहीची प्रक्रिया २९ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.