Electric Bus Contract
मुंबई : भाडेतत्त्वावरील ५१५० इलेक्ट्रिक बस पुरवठा करण्यात संबंधित कंपनी निष्क्रिय ठरली असून या कंपनीसोबत एसटी महामंडळाने केलेला निविदा करार रद्द करण्याबाबत कारवाई करावी, असे निर्देश परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले. परिवहन मंत्र्यांनी दुसऱ्यांदा दिलेल्या या निर्देशांची आता तरी अंमलबजावणी होणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
एसटी महामंडळाने ५१५० विजेवरील बस कंत्राटी पद्धतीने घेण्याचा करार इव्हे ट्रान्स कंपनीशी केला असून ही कंपनी दर महिन्याला २१५ बसेस देणार होती. पण वेळेत बसेस पुरविण्यात आल्या नाहीत. ठरलेल्या मुदतीत बसेस न पुरविणाऱ्या कंत्राटदार कंपनीवर कारवाई करण्याचे पत्र एसटीचे तत्कालीन अध्यक्ष, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांनी दिले होते. पण मुदत संपूनही कारवाई करण्यात आली नाही.
यापूर्वी भरत गोगावले अध्यक्ष असतानाही करार रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रताप सरनाई यांनीही असे आदेश दिले. आता परिवहन मंत्र्यांनी दुसऱ्यांदा दिलेल्या निर्देशांची तरी अंमलबजावणी होणार का, याविषयी साशंकता व्यक्त होत आहे. २२ मेपर्यंत संबंधित बस पुरवठादार कंपनीला १ हजार बसेस पुरवठा करण्याचे सुधारित वेळापत्रक दिले होते. परंतु या कालावधीपर्यंत एकही बस संबंधित कंपनीला पुरविणे शक्य झाले नाही. महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी याबाबत अनेकदा आवाज उठवला.
सरनाईक यांनी मंत्री म्हणून राज्यातील विविध बसस्थानकांना भेट दिली असता स्वच्छतेबाबत प्रचंड अनास्था दिसून आली. या संदर्भात प्रवाशांच्या, विशेषतः महिला प्रवाशांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. त्रुटी दाखवून दिल्यानंतर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करणे अपेक्षित असताना अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात असेल तर ते सहन केले जाणार नाही, असा सज्जड दम बैठकीत सरनाईक यांनी दिला.