राज्यासाठी ‘एनसीईआरटी’ची पाठ्यपुस्तके आवश्यक बदल करून स्वीकारली जाणार  File Photo
मुंबई

NCERT Syllabus : ‘एनसीईआरटी’ची पाठ्यपुस्तके आवश्यक बदल करून राज्यासाठी स्वीकारली जाणार!

‘एनईपी’च्या शालेयस्तरावरील अंमलबजावणीबाबत शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

मुंबई/पुणे : राज्यात शालेयस्तरावर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. त्यानुसार नवीन अभ्यासक्रम पहिल्यांदाच लागू होणार्‍या विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम करावा लागणार आहे. तसेच, राष्ट्रीय संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) तयार केलेली पाठ्यपुस्तके राज्यासाठी आवश्यक ते बदल करून स्वीकारली जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

शालेय शिक्षणाची पायाभूत, पूर्व माध्यमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशी 5+3+3+4 अशी रचना प्रस्तावित करण्यात आली आहे. नव्या धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. तसेच, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) तयार करण्यात आलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) 2024, राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) 2024 यातील तरतुदी योग्य त्या बदलांसह टप्प्याटप्प्याने लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, तसेच राज्य अभ्यासक्रम आराखड्यांच्या आधारे राज्याच्या गरजा लक्षात घेऊन राज्यासाठीचा अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम तयार करण्यात येत आहे. तसेच, नवीन अभ्यासक्रम पहिल्यांदाच लागू होणार्‍या विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम ‘एससीईआरटी’ने तयार करून तो आवश्यक त्या सर्व वर्षांमध्ये वापरावा. ‘एनसीईआरटी’ने तयार केलेली पाठ्यपुस्तके राज्यासाठी आवश्यक ते बदल करून स्वीकारण्यात यावीत. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, शिकणे हे सर्वांगीण, एकात्मिक, आनंददायक आणि रंजक असणे, आवश्यक शिक्षण आणि तार्किक विचारसरणी वाढवण्यासाठी अभ्यासक्रमाचा मजकूर कमी करणे, अनुभवात्मक शिक्षण या बाबींचा समावेश असणे आवश्यक आहे.

अंमलबजावणी वेळापत्रकानुसार इयत्तानिहाय पाठ्यपुस्तके आवश्यक त्या सर्व माध्यमांत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाची (बालभारती) राहील. पाठ्यपुस्तकांना पूरक साहित्य, हस्तपुस्तिका, सेतू वर्ग साहित्यनिर्मिती ‘एससीईआरटी’ यांच्यामार्फत करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय समितीची पाठ्यपुस्तकांना मंजुरी आवश्यक

पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी पाठ्यपुस्तकनिर्मितीमध्ये ‘एससीईआरटी’चे संबंधित विभागप्रमुख, विषयतज्ज्ञ यांचा समावेश असावा. पाठ्यपुस्तके निश्चित केलेल्या अध्ययन निष्पत्तींची पूर्तता करणारी, अंमलबजावणीसाठी योग्य असल्याची पडताळणी ‘एससीईआरटी’ने करावी. अंतिम केलेल्या पाठ्यपुस्तकांना शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समन्वय समितीची मान्यता घ्यावी. मान्यतेनंतरच पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी करता येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT