मुंबई/पुणे : होळी पौर्णिमा संपन्न होताच राज्यातील कमाल तापमानाने जणू 'टॉप गिअर' टाकला असून, सरासरी तापमानात दोन ते अडीच अंशांनी वाढ झाल्याने शुक्रवारी (दि. १४) राज्यात उष्णतेचा वणवाच पेटला. विदर्भातील ब्रह्मपुरी ४२, तर पुणे, अकोला, मालेगाव आणि चंद्रपूरचा पारा ४० अंशांवर गेला होता.
होळीपर्यंत वातावरणात थंडी असते. त्यानंतर किमान आठवडाभराने राज्यात उष्णता जाणवू लागते. पारा ३५ ते ३८ अंशांवर जाऊ लागतो. मात्र, यंदा होळीआधीच राज्यात उष्णतेची लाट सक्रिय झाली. पारा ९ मार्च रोजीच ४१ अंशांवर गेला होता. शुक्रवारी तो ४० ते ४२ वर गेला. त्यामुळे धुळवडीच्या दिवशी रंग खेळताना राज्यातील जनता अक्षरशः भाजून निघाली.
राज्यात गेल्या ४८ तासांपासून उष्णतेची तीव्र लाट आली असून, देशात सर्वोच्च तापमान नेहमी राजस्थान, गुजरात या भागात असते; मात्र यंदा महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक तापमान नोंदले जात आहे. प्रामुख्याने विदर्भ, कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि परिसर, तसेच मराठवाड्यातील नांदेड, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव या भागातील तापमान ३८ ते ४० अंशांवर जात आहे, त्यामुळे आगामी ४८ तास राज्याला सावधानतेचा इशारा दिला आहे
ब्रह्मपुरी ४२, चंद्रपूर ४०, पुणे ४०, कोल्हापूर ३७.९, महाबळेश्वर ३२.४, नाशिक ३६.३, सांगली ३९.२, सातारा ३७.९, सोलापूर ४१.१, मुंबई ३३, रत्नागिरी ३३, धाराशिव ३८.६, छत्रपती संभाजीनगर ३८.७, परभणी ३९.८, अकोला ४०, अमरावती ४०, नागपूर ४०.४, वर्धा ४१, यवतमाळ ४०.
चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ अकोला सवारी पुर नांदेड, परभणी या ठिकाणी कमाल तापमान ३८ ते ४० अंशांवर जाईल, त्यामुळे सकाळी ११ ते ४ पर्यंत बाहेर पडताना काळजी घ्यावी.- डॉ. अनुपम कश्यपी, माजी विभागप्रमुख, आयएमडी, पुणे