मुंबई ः शिक्षक, विद्यार्थी, शाळा यांच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीने राज्यव्यापी लाक्षणिक संप आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर 5 डिसेंबर रोजी मोर्चांचे आयोजन जाहीर केले असून, या आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सक्रिय आणि निर्णायक सहभाग नोंदवणार आहे.
गेल्या 2011 पूर्वी सेवेत दाखल शिक्षकांना टीईटीमधून सूट, जुन्या पेन्शन योजनेची पुनर्स्थापना, 10-20-30 वेतन प्रगती, संचमान्यतेतील त्रुटींचा तातडीने निपटारा, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांच्या अडकलेल्या पदोन्नती तत्काळ मंजूर करणे, आणि शिक्षकांना केवळ अध्यापनाचीच कामे देणे या सातत्याने प्रलंबित असलेल्या मागण्यांवर सरकारकडून ठोस निर्णय न घेतल्याने शिक्षक संघटनांनी संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे.
राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक संघ आणि राज्य प्राथमिक शिक्षक संघाची ऑनलाईन बैठक रविवारी घेण्यात आली. या बैठकीत आंदोलन यशस्वी करण्याचा ठराव मंजूर झाला, अशी माहिती बाळकृष्ण तांबारे यांनी दिली.