मुंबई : जनगणना, निवडणुका आणि आपत्ती व्यवस्थापन या कामांव्यतिरिक्त अन्य अशैक्षणिक कामे शिक्षकांना सोपविण्यास प्रतिबंध करणारी कायदेशीर तरतूद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. इमारत निधी किंवा अन्य कोणत्याही कारणाने विद्यार्थी, पालक किंवा शाळेतील कर्मचाऱ्यांकडून निधी उभारण्यास बंदी घालण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षक आणि विद्यार्थी-पालकांना मोठा दिलासा मिळणार असून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशात याबाबतचा कायदा करण्यात येणार आहे. राज्यातील एकूण शाळांपैकी २३ टक्के म्हणजेच २५ हजार ४९५ खासगी अनुदानित शाळा असून, त्यामध्ये २.७६ लाख शिक्षक कार्यरत आहेत. या शाळांमध्ये ९८.०६ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांचे व्यवस्थापन खासगी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून चालत असून या शाळांचे कामकाज १९७७ चा अधिनियम, १९८१ ची नियमावली आणि माध्यमिक शाळा संहितेच्या आधारे चालते.
मात्र, १९७७ चा कायदा प्रामुख्याने कर्मचारी सेवाशर्तींशी संबंधित असून, माध्यमिक शाळा संहितेला वैधानिक दर्जा नसल्याने अनकेदा न्यायालयीन वादात सरकारची अडचण होते. त्यामुळे राज्यातील खासगी अनुदानित शाळा व्यवस्थापनांची स्वायत्तता कायम ठेवतानाच त्यांच्यावर उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी तसेच शाळा प्रशासन अधिक जबाबदार बनविण्यासाठी सर्वसमावेशक कायदा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याबाबतचे विधेयक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.
या कायद्याच्या कक्षेतून शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांना वगळण्यात आले आहे. प्रस्तावित विधेयकात एकूण २० प्रकरणे आणि ७४ कलमे आहेत. नवीन अधिनियमात शाळा व्यवस्थापनांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जबाबदारी,विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक शैक्षणिक आणि इतर उपक्रम राबविण्याची तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षा, समुपदेशन, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुविधा आणि प्रवेश प्रक्रियेतील पारदर्शकतेची जबाबदारी शाळा व्यवस्थापनावर टाकण्यात आली आहे.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर नागपुरात होणार बैठक
विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक आणि व्यवहार्य तोडगा काढण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग कटिबद्ध असल्याची ग्वाही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उर्वरित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत गुरुवारी चर्चा करण्यात आली.
नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे नियोजनही करण्यात येत आहे. त्यामुळे प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीकडे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. यावेळी उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सहसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव अशोक मांडे, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.