ST bus service for weddings  
मुंबई

ST bus service for weddings | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कुटुंबांतील लग्नासाठी आता एसटी मिळणार सवलतीच्या दरात

New MSRTC schemes 2026 | अवैध प्रवासी वाहनांचे परवाने रद्द करणार; परिवहन मंत्री सरनाईक यांची विधान परिषदेत घोषणा

पुढारी वृत्तसेवा

MSRTC Offers Concessional ST Bus Service for Farmer Family Weddings

मुंबई : शेतकरी कुटुंबांना लग्नसमारंभासाठी सवलतीच्या दरात एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल. तसेच अवैध प्रवासी करणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द करण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली.

मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यात साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघाताच्या अनुषंगाने उबाठा गटाचे सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.

सरनाईक म्हणाले, शेतकरी कुटुंब लग्न किंवा अन्य शुभकार्यांसाठी अनेकदा ट्रक, डंपर किंवा अन्य अवैध वाहनांचा वापर करतात. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाकडे नवीन बसचा ताफा दाखल झाल्यानंतर शेतकरी कुटुंबात मुलगा किंवा मुलीचे लग्न असेल आणि त्यांनी एसटीकडे बसची मागणी केली, तर एसटी महामंडळ त्यांच्या दारापर्यंत बस पोहोचविण्यासाठी प्रयत्न करेल.

राज्यात वाढत्या लोकसंख्येमुळे रेल्वे, मेट्रो, एसटी आणि बेस्ट यांसारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांवर ताण वाढला असून त्याचा फायदा अवैध प्रवासी वाहतूक करणारे घेतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्य शासनाने ८,३०० नवीन एसटी बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्या टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होत आहेत. काही मार्गांवर प्रत्येक तासाला आणि पुढील दोन-तीन महिन्यांत दर अर्ध्या तासाने एसटी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. तसेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या सहकार्याने व्यापक सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यातील ‘ब्लॅक स्पॉट’ची ओळख करून तेथे आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. अटल सेतू, समृद्धी महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासारख्या प्रमुख मार्गांवर आपत्कालीन वैद्यकीय सुविधांनाही बळकटी देण्यात येईल.

राज्यात लवकरच ‘ॲग्रीगेटर पॉलिसी’

राज्यात लवकरच ‘ॲग्रीगेटर पॉलिसी’ जाहीर करण्यात येणार असून छोट्या वाहनांना नियमनबद्ध चौकटीत प्रवासी वाहतुकीची संधी देण्याचा विचार सुरू आहे. रॅपिडो, ओला आणि उबरसारख्या कंपन्यांकडून नियमबाह्य पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या बाईक टॅक्सी सेवांबाबतही शासन गंभीर असून कायदेशीर चौकट मजबूत केली जाईल, अशी ग्वाही सरनाईक यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT