नवी मुंबई: एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी झाल्याचा परिणाम म्हणून ऑक्टोबर महिन्यात उष्णता जाणवत आहे. मुंबईसह राज्यात १० ऑक्टोबर रोजी आतापर्यंतची सर्वाधिक ३८.०२१ मेगावॅट विजेची मागणी नोंदविण्यात आली.
उच्चदाब वीज प्रणालीतून ३२,९२१ मेगावॅट आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत सौर प्रकल्प व प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून ५१०० मेगावॅट वीज उपलब्ध झाल्याने उच्चांकी वीज मागणी पूर्ण केली.
राज्यातील ४८ लाख कृषिपंप सौर ऊर्जेवर चालविण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत एकूण १६,००० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
आतापर्यंत सात हजार मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. सध्या या योजनेमुळे व काही तांत्रिक उपायांचा अवलंब करून ८० टक्के कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे १० ऑक्टोबर या उच्चांकी मागणीच्या दिवशी सर्वाधिक ५५०० मेगावॅट वीज पुरवठा झाला. सौरऊर्जा प्रकल्पात वीजनिर्मिती बदलत असते. त्यातून होणाऱ्या वीजनिर्मितीमुळे राज्याला दिलासा मिळत आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे तिहेरी लाभ - मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे दिवसभरात मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध झाल्यामुळे शेतीसाठी रात्रीच्या ऐवजी दिवसा वीजपुरवठा करण्यात येत आहे.
या योजनेत सरासरी ३ रुपये ९ पैसे प्रतियुनिट इतक्या कमी दराने वीज उपलब्ध होत असल्याने रात्रीची महाग वीज विकत घ्यावी लागत नाही. सप्टेंबर महिन्यात या योजनेतून ८७८ दशलक्ष युनिट वीज उपलब्ध झाली. रात्रीचा शेतीपंपांचा २५०० मेगावॅट इतका भार दिवसा वळविल्यामुळे कमाल वीजदराच्या तुलनेत वीजखरेदीचे ३८४ कोटी रुपये वाचले.
दुष्काळी परिस्थितीत राज्यात उन्हाच्या झळा जाणवत आहेत. विजेची मागणी प्रचंड वाढली असताना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेचा मोठा लाभ झाला आहे. त्यासोबत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून राज्यात छतांवर उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांचाही लाभ झाला आहे. या योजनांमुळे दिवसा वीज मागणी वाढलेली असताना विजेची उपलब्धता आणि वीज खरेदीतील मोठी बचत असा दुहेरी दिलासा मिळाला आहे.- लोकेश चंद्र, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महावितरण