Snake Bite Test Kit Pudhari
मुंबई

Snake Bite Test Kit: आला पावसाळा...सर्पदंशापासून सांभाळा! राज्य सरकारचे मान्सूनपूर्व ‌‘अँटी-व्हेनम मिशन‌’

1 लाख सर्पविष तपासणी किटची खरेदी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मान्सून काळात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन विषारी व बिनविषारी सर्पदंशाची त्वरित ओळख पटावी यासाठी राज्य सरकारने 1 लाख 10 हजार 213 सर्पविष जलद तपासणी किट खरेदीस मंजुरी दिली आहे.

यासाठी 6 कोटी 14 लाख 43 हजारांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या किटच्या साहाय्याने रुग्णाला विषारी सापाने दंश केला आहे की नाही, याची अचूक तपासणी करता येणार आहे.

शासन निर्णयानुसार प्रत्येक तपासणी किटची किंमत 557 रुपये निश्चित केली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत एकल स्रोत पद्धतीने या किटची खरेदी केली जाणार आहे. विशेषतः ग्रामीण, आदिवासी आणि वनक्षेत्रातील आरोग्य सेवांना यामुळे मोठी मदत होणार आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सर्पदंशाच्या अनेक प्रकरणांत डॉक्टरांना रुग्णाची लक्षणे आणि परिस्थिती लक्षात घेऊन उपचार सुरू करावे लागतात. नव्या तपासणी किटमुळे विषाची उपस्थिती त्वरित समजू शकणार असल्याने उपचार प्रक्रिया अधिक अचूक व वेळेत होणार आहे.

राज्यभरातील रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये सर्पविष तपासणी किट उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा सर्पदंश व्यवस्थापन अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक किट

जिल्हानिहाय वाटपात नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक 25,500 किट मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यानंतर भंडारा (12,575), वाशीम (12,400) आणि नंदुरबार (11,000) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. अमरावती, नांदेड, परभणी, गडचिरोली आणि गोंदिया या सर्पदंशग्रस्त जिल्ह्यांनाही मोठ्या प्रमाणात किट उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT