मुंबई : राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या वेळापत्रक पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार हा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदारयाद्या जाहीर केल्या जातील. तर, अंतिम मतदारयादी आता ७ ऑक्टोबरऐवजी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील या प्रक्रियेला जवळपास महिनाभराची मुदतवाढ मिळाली आहे.
राज्यभरात सुरू असलेल्या एसआयआरमध्ये तब्बल १ कोटी ८० लाख ६० हजार ६९७ मतदार याद्यांमधून बाहेर फेकले गेले आहेत. त्यात मुंबईतील संख्या ३७.५७% तर उपनगरांतील संख्या ३४.४७% आहे. ठाण्यातूनही २८ लाख ८८ हजार २४० मतदार यादीतून गायब आहेत. प्रारूप यादी ३१ ऑगस्टला आल्यानंतर हे सर्व मतदार आपले आक्षेप नाेंदवू शकतील. अन्यथा अंतिम मतदार यादी आल्यानंतर या सर्व मतदारांना सर्व पुरावे घेऊन नव्याने मतदार नोंदणी करावी लागेल.
प्रारूप मतदारयादीवर दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर असा कालावधी देण्यात आला आहे. दाखल झालेल्या दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण करायची आहे. त्यानंतर, ४ नोव्हेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे.