Voter List  Pudhari
मुंबई

SIR Voter List: राज्याची प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध; वगळलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी

एसआयआरअंतर्गत महाराष्ट्रातील प्रारूप मतदार याद्या सोमवारी प्रसिद्ध होणार. वगळलेल्या मतदारांची स्वतंत्र यादीही जारी केली जाईल. दावे-हरकतीनंतर ४ नोव्हेंबरला अंतिम यादी जाहीर होणार.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेंतर्गत (एसआयआर) सोमवारी राज्यातील प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रारूप मतदार यादी प्रकाशित केली जाणार आहे.

यासोबतच एसआयआर प्रक्रियेअंतर्गत वगळण्यात आलेल्या मतदारांची नावेही स्वतंत्र यादीद्वारे जारी केली जाणार आहेत. यादी प्रकाशित केल्यानंतर दावे-हरकतींसाठी सुमारे महिनाभराचा अवधी देण्यात आला असून ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये गृहभेटींद्वारे गणन प्रपत्र भरून घेण्यासह त्यांच्या डिजिटायझेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. २४ ऑगस्टपर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना पार पाडण्यात आली.

निवडणूक आयोगाकडून सोमवारी प्रारूप मतदार यादीसह वगळण्यात आलेल्या मतदारांची नावे जाहीर केली जातील. त्यानंतर ज्या नागरिकांची नावे या प्रारूप यादीत नसतील त्यांनी १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत तसेच वयाची १८ वर्षे पूर्ण होतील असे नव मतदार आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज क्रमांक सहा सादर करू शकतात.

प्रारूप मतदार यादीसंदर्भात ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येऊ शकतील. ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा करण्यात येईल. अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

७८.८५ टक्के मतदारांचे गणना प्रपत्र संकलित

राज्यातील मतदार यादीत सध्या ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदारांची नोंद आहे. त्यापैकी ७८.८५ टक्के मतदारांचे गणना प्रपत्र संकलीत झाले आहेत. एकूण मतदारसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण २१.१५ टक्के इतके आहे. आतापर्यंत जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार एकूण, ७५ लाख ५२ हजार मतदार अनुपस्थित, ७६ लाख ८० हजार मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित आणि ३४ लाख ८१ हजार मतदार मृत असल्याची स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT