प्रगतिपुस्तकासोबत उत्तरपत्रिकाही दाखवणे बंधनकारक 
मुंबई

School News : प्रगतिपुस्तकासोबत उत्तरपत्रिकाही दाखवणे बंधनकारक

१ मेपासून अंमलबजावणी; शिक्षण विभागाकडून आदेश जारी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी यंदाचा निकाल १ मे २०२६ रोजी जाहीर होणार असून, यंदाच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रगतिपुस्तकासोबत विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाही पालकांना दाखविणे शाळांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.

यासंदर्भातील आदेश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला असून, राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांना हा आदेश पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या उत्तरपत्रिका प्रत्यक्ष पाहता येणार आहेत आणि शिक्षकांनी केलेले मूल्यमापनही समजून घेता येणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा घडवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे आवश्यक मानले जाते. त्याच अनुषंगाने शिक्षण संचालनालयाने हा निर्णय घेतला आहे. यापुढे प्रगतिपुस्तकासोबत विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांना दाखवणे अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयामुळे पालकांना आपल्या मुलांनी परीक्षेत नेमके काय लिहिले, कोणत्या चुका केल्या आणि त्यांची संकल्पना कितपत स्पष्ट आहे, हे समजणे सोपे होणार आहे.

सकारात्मक बदल अपेक्षित

या नव्या उपक्रमामुळे अनेक सकारात्मक बदल अपेक्षित आहेत. केवळ गुणांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या ज्ञान, लेखनकौशल्य आणि समज यावर आधारित मूल्यांकन करता येईल. पालकांना आपल्या पाल्याच्या कमकुवत बाजू ओळखता येतील आणि त्यावर घरीच उपाययोजना करण्यास मदत होईल. तसेच, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयी, वाचन आणि लेखनाच्या पद्धतीबाबत पालक अधिक सजग होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT