मुंबई: प्रादेशिक परिवहन कार्यालयांमधील (आरटीओ) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी आज (१६ जून) पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपामुळे राज्यभरातील आरटीओच्या अनेक सेवा ठप्प झाल्यास त्याचा त्रास नागरिकांना होणार आहे.
मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, विभागाचा आकृतीबंध मंजूर होऊन साडेतीन वर्षांचा कालावधी उलटला आहे.
तरी अद्याप सेवा प्रवेश नियम तयार झालेले नाहीत. त्यामुळे कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित आहेत. त्यांना आर्थिक आणि सामाजिक नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी, संतापलेल्या आरटीओ कर्मचाऱ्यांनी आता आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रशासन स्तरावर सुटू शकतात. मात्र, प्रशासनाची तशी मानसिकता नाही. नेहमीच्या या टोलवाटोलवीमुळे आरटीओ कर्मचारी संतप्त झाले आहेत. शनिवारी झालेल्या तातडीच्या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी बेमुदत संपाशिवाय पर्याय नसल्याची तीव्र भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे आरटीओ कर्मचारी संपावर जात असल्याचे संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी सांगितले.
मुंबई विभाग संपात सहभागी होणार नाही
दरम्यान, मोटार वाहन विभाग कर्मचारी मुंबई संघटनेने आजपासून सुरू होणाऱ्या बेमुदत संपाबाबत घेतलेल्या बैठकीत प्रादेशिक परिवहन कार्यालय, बोरिवली, मुंबई (मध्य) तसेच मुंबई पूर्व व पश्चिम कार्यालयातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता बऱ्याच कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होण्यास असहमती दर्शवली आहे.
त्यामुळे १६ जूनपासून महाराष्ट्र कार्यकारिणीने पुकारलेल्या बेमुदत संपात मुंबई विभागीय कर्मचारी संघटना सहभागी होणार नसल्याचे मुंबई विभागाने एका पत्राद्वारे सोमवारी उशिरा जाहीर केले आहे.