केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, मंत्री पंकजा मुंडे 
मुंबई

Maharashtra River |देशातील पहिल्या राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचे मंत्री पंकजा मुंडेंचे केंद्रीय मंत्र्यांसमोर सादरीकरण

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेतली, नद्यांना प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी राज्याचा पुढाकार

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील नद्यांना प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून यासाठी 'राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण' स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण संकल्पना मांडली होती. यासंदर्भात राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय विभाग आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेतली. या भेटीत देशातील अशा प्रकारच्या पहिल्या प्रस्तावाचे सादरीकरण केले.

या बैठकीत पंकजा मुंडे यांनी राज्यातील जल आणि पर्यावरण प्रकल्पांच्या सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा केली. नद्यांच्या स्वच्छतेसाठी केंद्र सरकारच्या मदतीसोबतच राज्याची स्वतःची एक स्वतंत्र यंत्रणा आणि नियोजन असणे काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. मंत्री मुंडे यांनी सांगितले की, देशातील अनेक नद्या विविध राज्यांतून प्रवाहित होतात. जर प्रत्येक राज्याने आपल्या भौगोलिक सीमेतील नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी आणि पुनरुज्जीवनासाठी स्थानिक पातळीवर प्रभावी व सुनियोजित योजनांची अंमलबजावणी केली, तर नद्यांचे पूर्णतः प्रदूषणमुक्त होण्याचे स्वप्न सत्यात उतरू शकेल. या प्रक्रियेमुळे भविष्यात नद्यांचे पावित्र्य आणि त्यांची नैसर्गिक प्राकृतिकता टिकवून ठेवण्यात देशाला मोठे यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रस्तावावर केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्राने याबाबत घेतलेल्या पुढाकारबद्दल विशेष कौतुक केले आणि यासाठी सर्वोतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीस राष्ट्रीय नदी संरक्षण संचलनालयाचे संचालक राजेश कुमार, महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज यांसह केंद्र व राज्यातील इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT