मुंबई: राज्य सरकारने प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास बुधवार ५ ऑगस्टपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर नियमित वैद्यकीय सेवा बंद ठेवतील, असा इशारा सेंट्रल मार्ड महाराष्ट्रने दिला आहे.
सेंट्रल मार्डने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंतिम निवेदन सादर करून, न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत सीसीएमपी प्रमाणपत्रधारक बीएचएमएस व्यावसायिकांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी प्रक्रियेला स्थगिती देण्याची तसेच निवासी डॉक्टरांच्या दीर्घकालीन प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
शासनाकडे वारंवार बैठका व निवेदने सादर करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ५ ऑगस्टपासून राज्यभर लोकशाही मार्गाने नियमित वैद्यकीय सेवांमधून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, रुग्णहित लक्षात घेऊन संपाच्या पहिल्या २४ तासांत आपत्कालीन विभाग, कॅज्युअल्टी आणि सर्व जीवनावश्यक वैद्यकीय सेवा सुरू राहतील, असे सेंट्रल मार्डने स्पष्ट केले आहे.