Online work boycott pudhari
मुंबई

Online work boycott: शिक्षक १ डिसेंबरपासून प्रशासकीय व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडणार; ऑनलाइन कामांना असहकार!

राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: ऑनलाइन कामांचा वाढता अतिरेक, अशैक्षणिक कामांचा ताण आणि प्रशासनाकडून वेळी-अवेळी दिले जाणारे आदेश यामुळे त्रस्त झालेल्या राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी आता असहकाराचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या १ डिसेंबरपासून अध्यापन कार्यावर परिणाम करणारी ऑनलाइन कामे न करण्यासह कथित प्रशासकीय व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्धार राज्यातील विविध प्राथमिक शिक्षक संघटनांनी केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि दैनंदिन अध्यापन ऑनलाइन कामांच्या वाढत्या व्यापामुळे प्रभावित होत असल्याची शिक्षक संघटनांची भूमिका आहे.

विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी शिक्षकांना विविध ऑनलाइन माहिती भरणे, अहवाल सादर करणे, वेगवेगळ्या उपक्रमांची अंमलबजावणी करणे आणि प्रशासकीय आदेशांचे पालन करण्यातच वेळ घालवावा लागत आहे. त्यातच प्रशासकीय व्हॉट्सॲप ग्रुपवर अहोरात्र येणारे संदेश, सूचना आणि आदेश यामुळे शिक्षकांवरील मानसिक ताण वाढत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

शासनाने अशैक्षणिक कामे न देण्याबाबत निर्णय घेतलेला असतानाही अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षकांवर वेगवेगळ्या स्वरूपाची अशैक्षणिक कामे लादली जात आहेत. शाळांमधील स्वयंसेवी संस्थांचा (एनजीओ) वाढता हस्तक्षेप, संचमान्यता धोरणाचे दुष्परिणाम, टीईटीबाबत शासनाची भूमिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे अस्तित्व धोक्यात आणणारी धोरणे याबाबतही शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली.

वारंवार आंदोलने, निवेदने आणि चर्चांनंतरही शिक्षकांच्या मूलभूत प्रश्नांवर शासनाकडून सकारात्मक निर्णय होत नसल्याने एकत्रित लढा उभारण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली.

या बैठकीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ , अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य पदवीधर व केंद्रप्रमुख शिक्षक संघटना, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना, स्वतंत्र समता शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक महासंघ, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, प्रहार शिक्षक संघटना आणि महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी व अधिकारी संघटनेचे राज्य पदाधिकारी उपस्थित होते.

एकत्रितपणे आंदोलन

बैठकीत सर्व संघटनांनी एकत्रितपणे टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. १ डिसेंबरपासून ऑनलाइन कामांबाबत असहकार आणि प्रशासकीय व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT