Bjp Gujarat Pattern Impact On Maharashtra Local Body Election 2025
मुंबई : गौरीशंकर घाळे
अख्ख्या मंत्रिमंडळाचा राजीनामा घेण्याच्या गुजरात पॅटर्नने महाराष्ट्रील भाजप मंत्र्यांची धास्ती वाढल्याचे चित्र दिसू लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर गुजरातमध्ये भाजपने सर्व मंत्र्यांचे तडकाफडकी राजीनामे घेत खांदेपालट केला आहे. महाराष्ट्रातही पुढील तीन महिन्यांत निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. या निवडणुकांची सारी जबाबदारी भाजपने संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि संपर्कमंत्र्यांवर सोपविली आहे. आपापल्या जिल्ह्यात विजयाचा गुलाल लागला, तरच राज्यातल्या मंत्रिपदाचा लाल दिवा कायम राहणार असल्याने भाजपचे मंत्री कामाला लागले आहे.
शेजारच्या गुजरात राज्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असून गुरुवारी तेथील मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील 19 मंत्र्यांचे सामूहिक राजीनामे घेतले गेले. त्यापैकी केवळ दोनच मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. बाकीच्या सर्व ज्येष्ठ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर स्थानिक पातळीवरील नाराजी दूर करतानाच नव्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी सामूहिक राजीनाम्याचा गुजरात पॅटर्न राबविण्यात आला.
गुजरातमधील या ऑपरेशनने महाराष्ट्रातील मंत्र्यांवरील दबाव वाढला आहे. आगामी जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजपने कंबर कसली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागवार बैठकांच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्या. यात प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला.
यश मिळवण्याचे पालकमंत्र्यांपुढे आव्हान
गेल्या सहा महिन्यांत राज्य सरकारच्या पातळीवरून पालकमंत्री अथवा संबंधित संपर्कमंत्र्यांनी सुचवलेली स्थानिक कामे मार्गी लावत प्रलंबित विषयांचा निपटारा करण्यात आला. भाजपने निवडणुकांची सारी जबाबदारी त्या त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांवर सोपविली आहे. ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही, तिथे भाजपने सोयीसाठी संपर्कमंत्री नेमले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळवून देण्याची कामगिरी ही पालकमंत्री आणि संपर्कमंत्र्यांना पार पाडावी लागणार आहे.
राज्यातील महायुती सरकारच्या सत्ता समीकरणात ज्या जिल्ह्यात भाजपचे पालकमंत्री नाहीत, अशा 15 जिल्ह्यांत भाजपने संपर्कमंत्री नेमले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आपला पालकमंत्री नसला तरी कामे मार्गी लावण्यासाठी संपर्कमंत्र्यांची योजना आहे.
...अन्यथा मंत्रिपदावर गदा
पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील निवडणुकीत विजयाचे गणित जुळवायचे, जोडीलाच संपर्कमंत्री म्हणून मिळालेल्या जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकीत कमळ फुलविण्याची जबाबदारी भाजप मंत्र्यांवर आली आहे. ही दुहेरी कसरत यशस्वीपणे पार न पडल्यास मंत्रिपदावर गदा येण्याची शक्यता आहे. त्यातच अख्ख्या मंत्रिमंडळाचा सामूहिक राजीनामा घेत भाजपने नवा गुजरात पॅटर्न आता समोर आणला आहे. त्याने महाराष्ट्रातील मंत्र्यांची धास्ती वाढली आहे.