मुंबई

Maharashtra Politics : पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांचा तिढा सुटेना!

मोहन कारंडे

– दिलीप सपाटे, मुंबई

तीन महिने उलटून गेले तरी महायुतीत पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. अनेक मंत्र्यांना स्वतःच्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हवे आहे. नाशिक, पुणे आणि रायगड या तीन जिल्ह्यावरून हा वाद निर्माण झाला आहे.

शिवसेना – भाजप युतीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सामील होऊन आणि त्यांच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेऊन आता तीन महिने उलटून गेले तरी महायुतीत पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. राष्ट्रवादीचे मातब्बर आणि अनुभवी नेते मंत्रिमंडळात सामील झाले असून, त्यापैकी अनेक मंत्र्यांना स्वतःच्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हवे आहे. त्यातून निर्माण झालेला हा तिढा सोडविणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी बनला आहे. परिणामी वाद वाढू नये, म्हणून हा मुद्दा तूर्त बाजूला ठेवण्यात आला आहे.

मुख्यतः नाशिक, पुणे आणि रायगड या तीन जिल्ह्यांवरून हा वाद निर्माण झाला आहे. सद्या नाशिकचे पाकमंत्रिपद भाजप नेते आणि ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांच्याकडे आहे. पण, शरद पवार यांची साथ सोडून छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतली आणि नाशिक जिल्ह्याच्या पाकमंत्रिपदावर भुजबळ यांनी दावा केला. आता भुजबळ यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचा आग्रह कसा डावलायचा? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पडला आहे. मात्र, राजकीयद़ृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भाजपालाही सोडायचे नाही. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा पेच निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्यात तर वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांची मंत्री होऊन पालकमंत्री होण्याची इच्छा आहे. त्यांनी ती अनेकवेळा जाहिररीत्या बोलूनही दाखविली आहे.

याशिवाय शिंदे गटाचे महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे हे आमदार आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात शिंदे गटाचे तीन आमदार असल्याने रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिंदे गटाने आपला दावा सांगितला आहे. पण, तेथे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तटकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर दावा सांगितला आहे. अजित पवारही रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. यापूर्वी पालकमंत्री असताना आदिती तटकरे यांनी म्हणावा तसा निधी दिला नसल्याने, त्यात भेदभाव केल्याने शिंदे गटाचे आमदार त्यांना पालकमंत्री करण्याच्या विरोधात आहेत. परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

पुणे जिल्हा हा राजकीयच नव्हे तर औद्योगिक, शैक्षणिकद़ृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. पुणे आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता होती. त्यामुळे भाजपला या जिल्ह्याचे पाकमंत्रिपद महत्त्वाचे वाटत आहे. सद्या उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री आहेत. पण, अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्याने व त्यांचे पुणे जिल्ह्यावरील वर्चस्व पहाता त्यांनाही पुणे जिल्ह्याचेच पालकमंत्रिपद हवे आहे. उपमुख्यमंत्र्यांचा हा आग्रह टाळणे मुख्यमंत्री शिंदेंना कठीण होऊन बसले आहे. या तीन जिल्ह्यांच्या वादामुळे पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या खोळंबल्या आहेत. त्यावर तोडगा काढून पाकमंत्री नियुक्त करावेत, असा दबाव तिन्ही पक्षातील मंत्र्यांचा आहे. पण, गेली तीन महिने हा घोळ काही मिटलेला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT