प्रमोद चुंचूवार, मुंबई
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला दारुण पराभव, त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात एकमेकांवर टीकाटिप्पणी करण्यामुळे पडलेली वादाची ठिणगी आणि दिल्लीत नितीशकुमार यांच्या मोदी सरकारला असलेल्या पाठिंब्यावरून सुरू झालेली नकारात्मक चर्चा यामुळे आगामी काळात जुळवाजुळवीच्या समीकरणात राजकीय वादळाचे संकेत मिळत आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी औपचारिक-अनौपचारिक पातळीवर एकमेकांवर पराभवाचे खापर फोडण्याचा प्रयत्न केला. जागावाटपावरूनही एकमेकांना लक्ष्य करण्याचे काम तीनही पक्षांनी केले. काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात वाद आणि तणाव अधिक बघायला मिळाला आणि आजही मिळत आहे. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आपणच राज्याचे मुख्यमंत्री होऊ, अशी सुप्त इच्छा होती. आपल्याच पक्षाला सर्वाधिक जागा वाटपात मिळाव्यात आणि सर्वाधिक जागा आपल्याच जिंकून याव्यात या ईरेने हे दोन्ही पक्ष पेटले होते. लोकसभा निकालातील उत्तम कामगिरीने त्यांच्यात अतिआत्मविश्वास बघायला मिळत होता.
निकालानंतर सुरू झालेली भांडणे दीड महिन्यानंतरही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. निकालापासून काही धडा घेऊन दुरुस्ती करणारी पावले काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट उचलताना दिसत नाहीत. महाविकास आघाडीतील ताज्या वादाची ठिणगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या विधानाने पडली. काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही, असे वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुंबईतील बैठकीत केले. यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेने त्यांना तिखट शब्दांत प्रत्युत्तर देतानाच एकमेकांवरही शाब्दिक हल्ले चढविले.
महाविकास आघाडीतील काँग्रेस नेत्यांची वक्तव्ये पाहिली की, या नेत्यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरील नाराजी लपून राहात नाही. शुक्रवारी विजय वडेट्टीवार, नितीन राऊत यांच्या वक्तव्यांचा सूर पाहिला तर पटोलेंनी जागावाटपात घोळ घातला, जागावाटप विलंबात काही तरी षड्यंत्र होते, असे या नेत्यांना वाटते. ते प्रत्यक्ष बोलत नसले तरी पटोलेंमुळेच काँग्रेसला हादरा बसला, पटोले भाजपसाठीच काम करतात, अशी काही काँग्रेसजनांची भावना असून ते खासगीत ही भावना व्यक्त करतात. तसेच शिवसेना ठाकरे गट आणि संजय राऊत यांच्या अडेलतट्टूपणामुळे जागावाटपात घोळ आणि विलंब झाल्याचे काँग्रेस नेत्यांना वाटते. काँग्रेस श्रेष्ठींकडून नवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नेमला जात नसल्याने ते नाराज आहेत. या नाराजीचा उद्रेक अधूनमधून काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यातून होताना दिसतो.
महाविकास आघाडीतील बिघाडी यावेळेस गंभीर रूप धारण करू शकते, असे संकेत प्राप्त होऊ लागले आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टेकूवर टिकले आहे. संक्रांतीनतर केव्हाही नितीशकुमार हे केंद्रातील सरकामधून बाहेर पडू शकतात आणि इंडिया आघाडीसोबत जाऊन बिहारची विधानसभा निवडणूक लढवू शकतात,अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचा चेहरा वापरून सत्ता आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री करण्यात आला. बिहारमध्येही असे होऊ शकते, असे त्यांना वाटत आहे. नितीशकुमार यांच्याकडे 12 खासदार तर चंद्राबाबू नायडू यांच्याकडे 16 खासदार आहेत. नितीशबाबू एनडीतून बाहेर पडल्यास सरकार लगेच कोसळणार नाही. मात्र, त्याच्या स्थैर्यासाठी खासदारांचे बळ मोदी सरकारला लागणार आहे. हे बळ महाराष्ट्रातून गोळा करण्याची रणनीती भाजपने अवलंबली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आणि शिवसेना(ठाकरे) पक्षाचे खासदार यांना एनडीएत आणण्यासाठी, त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजपतर्फे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे शरद पवारांनी संघाची केलेली प्रशंसा, राजकारणात केव्हाही काही घडू शकते हे देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य तसेच ‘सामना’च्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांची झालेली प्रशंसा आणि राजकारणात कुणी कायमचे शत्रू नसते, हे त्यांचे वक्तव्य म्हणजे एनडीए आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व शिवसेना घटक पक्ष यांच्यातील वाढती जवळीक याचा पुरावा मानला जाऊ लागला आहे. एक दोन महिन्यांत पवारांचे सात खासदार एनडीएला पाठिंबा देतील किंवा अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करतील, असे दावे भाजप आणि राष्ट्रवादीतील काही उच्चपदस्थ सूत्रे करीत आहेत. अर्थात शरद पवार भाजपसोबत येणार नाहीत, मात्र त्यांचे खासदार येतील आणि पवार बाप-लेक हेच खासदार पक्षात उरतील, असेही सांगितले जात आहे. शिवसेना ठाकरे गटही भाजपसोबत जुळवून घेण्याच्या मन:स्थितीत दिसत असल्याने त्यांनीही अद्याप राज्य विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची पत्र लिहून जागा मागितलेली नाही. या चर्चांनी महाविकास आघाडीत अस्वस्थता पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्ष भाजपसोबत गेले तर विरोधी पक्षांचे मैदान आम्हाला मोकळे मिळेल, अशी भावना काँग्रेस नेते व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील वाद भविष्यातील वादळाचे संकेत तर नाहीत ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.