मुंबई; पुढारी वृत्तसेवा : Maharashtra police राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना आता फक्त आठ तासाची ड्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक संजय पाडे यांनी दिली आहे.
राज्य सरकारने महिला पोलिसांच्या कामाचे तास 12 तासांवरुन 8 तासांवर आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळते. राज्य सरकारच्या या निर्णयाचे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह सुप्रिया सुळे यांनी देखील स्वागत केले आहे.
नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तासाचा ड्युटीचा उपक्रम सुरू केल्यानंतर पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस घटकांनी या निर्णयाबाबत विचार करावा अशी सूचना केली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनीही महिला पोलिसांसाठी आठ तासांची ड्युटी जाहीर केली होती, त्यापाठोपाठ असा निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी करणारे अमरावती शहर पोलीस आयुक्त पोलीस तिसरे ठरले होते.
अखेर राज्य पातळीवर Maharashtra police महिला पोलिसांसाठी 08 तास ड्युटीचा निर्णय घेण्यात आला असून चार तासांची ड्युटी कपात केल्याने महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे. पोलीस दलात कर्तव्य बजावण्यासोबतच महिलांना कौटुंबीक जबाबदारी पार पाडावी लागते. अनेक वेळा सण-उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्हे यांची उकल करताना अनेक वेळा 12 तासापेक्षा जास्त कर्तव्य बजावावे लागते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक जबाबदारीवर आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. आता त्यांना ड्युटीमध्ये चार तासाची सवलत मिळाल्याने महिला कर्मचाऱ्यांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र सरकारने महिला पोलीसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील जी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याचा निर्णय अतिशय चांगला आहे. पोलीस महासंचालक पांडे आणि पोलीस दल, गृह विभानं महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतेय, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
हे ही वाचलं का?