मुंबई : राज्य पोलिस दलातील 15 हजार पोलिसांच्या भरतीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. गृह विभागाने बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. राज्य मंत्रिमंडळाने दोन आठवड्यांपूर्वीच पोलिस भरती करण्याचा निर्णय घेतला होता.
गृह विभागाच्या ‘जीआर’नुसार महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस शिपाई आणि कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 15 हजार 631 रिक्त पदे भरण्यासाठीच्या भरती प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे.
या भरतीअंतर्गत पोलिस शिपायांची 12 हजार 399 पदे, पोलिस शिपाई चालकांची 234, बँडस्मनची 25, सशस्त्र पोलिस शिपायांची 2 हजार 393 आणि कारागृह शिपायांच्या 580 पदांचा समावेश आहे.
दरम्यान, 2022 आणि 2023 मध्ये संबंधित पदांची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एकवेळची विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी या पूर्वीच्या पोलिस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 450 रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 350 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे.