मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील वारेमाप वाढलेल्या फार्मसी संस्थांची तपासणी करत भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेकडे (पीसीआय) अहवाल पाठविला होता. त्यानंतर राज्यातील फार्मसीच्या पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांच्या 89 संस्थांना प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आले आहे. पदविका 71 संस्थांचा आणि पदवीच्या 18संस्थांचा समावेश आहे. या संस्थांची यादीही पीसीआयने जाहीर केली आहे.
गेल्या चार वर्षापूर्वी कोरोना काळात राज्यातील फार्मसी संस्थांमध्ये प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली होती. त्यामुळे अनेक नव्या संस्थांनी मान्यतेसाठी पीसीआयकडे अर्ज पाठवले होते. गेल्या तीन वर्षांत पीसीआयने पदविका 220 आणि पदवीच्या 92 नव्या महाविद्यालयांना परवानगी दिली. या संस्था सर्व निकष पूर्ण करतात का, हे तपासण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तंत्रशिक्षण संचालनालय आणि तंत्र शिक्षण मंडळ यांच्यातर्फे या संस्थांची झाडाझडती घेत पाहणी केली.
नोटिसीला उत्तर देताना काही संस्थांनी समाधानकारक खुलासा केला. पण इतर संस्थांबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत तंत्रशिक्षण संचालनालयाने पीसीआयला पत्र पाठवले होते. पीसीआयने या अहवालाची दखल घेत बी फार्म (पदवी) आणि डी फार्मच्या (पदविका) अशा 89 संस्थांना यंदाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर काढले जाणार आहे.
पाहणीत आढळल्या धक्कादायक गोष्टी
पदविका अभ्यासक्रमाच्या 220 पैकी 128 संस्था पात्रतेचे निकष पूर्ण करत नसल्याची बाब समोर आली. अग्निसुरक्षा प्रमाणपत्रच न घेणे, प्रयोगशाळांची संख्या कमी असणे, कर्मचारी संख्या कमी असणे अशा गोष्टी आढळून आल्या.