मुंबई: राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी अर्थात संकलित मूल्यांकन चाचणी-१ (पॅट-१) नोव्हेंबर २०२६च्या अखेरच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून याबाबतचे वेळापत्रक आणि परीक्षेच्या आयोजनासंदर्भातील सविस्तर सूचना जारी केल्या आहेत. या चाचणीत प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांचा समावेश असून, विद्यार्थ्यांची लेखी तसेच तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे.
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीचे मूल्यमापन करण्यासाठी पॅट-१चे आयोजन केले जाणार आहे. या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यात येणार असून, त्यानुसार पुढील अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यास शिक्षकांना मदत होणार आहे.
विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादणुकीत वाढ करण्याच्या दृष्टीने ही चाचणी महत्त्वाची ठरणार आहे. यानंतर संकलित मूल्यांकन चाचणी-२ एप्रिल २०२७मध्ये घेण्यात येणार आहे.
लेखी परीक्षा झाल्यानंतर त्याच दिवशी तोंडी परीक्षा घेता येणार आहे. पॅट-१च्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्तीनिहाय कामगिरी नोंदविण्यात येणार आहे.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणांचे विश्लेषण करून त्यानुसार कृती कार्यक्रम तयार करावा आणि त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना परिषदेकडून देण्यात आल्या आहेत. ४ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे.