मुंबई : अमेरिकेत कृषी क्षेत्रामध्ये सर्वाधिक प्रगत राज्य असलेल्या आयोवासोबत महाराष्ट्र सरकारने कृषी, जैवतंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांतील सहकार्यासाठी सामंजस्य करार केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयोवाच्या गव्हर्नर किम रेनॉल्ड्स यांच्या उपस्थित शुक्रवारी या करारांवर सह्या करण्यात आल्या.
एकीकडे अमेरिका आणि भारत टॅरिफ युद्धामुळे एकमेकांसमोर आले असताना दोन्ही देशांतील राज्यांनी परस्पर सहकार्याचे करार केले, ही सकारात्मक बाब असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.अमेरिकेतील कृषिप्रधान आयोवा राज्याशी महाराष्ट्राने ऐतिहासिक सामंजस्य करार केला. आयोवा हे राज्य शेती व कृषितंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत राज्य मानले जाते. या करारांद्वारे महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती, कृषितंत्रज्ञान, डिजिटायझेशन, आरोग्य, व्यावसायिक प्रशिक्षण व कौशल्य विकास, पर्यटन, क्रीडा, जैवतंत्रज्ञान, सामाजिक-आर्थिक सेवा, नवीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा विकास या महत्त्वाच्या क्षेत्रांत नव्या संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
अमेरिकेतील एखाद्या राज्यासोबत महाराष्ट्राने केलेला हा पहिलाच करार असून, तो भारत-अमेरिका संबंधांना अधिक बळकट करेल. गव्हर्नर रेनॉल्ड्स यांनी महाराष्ट्राशी दीर्घकालीन भागीदारी करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याने दरवर्षी आयोवाचे शिष्टमंडळ भारतात येईल आणि महाराष्ट्राचे शिष्टमंडळ आयोवाला भेट देईल. हे करार म्हणजे महाराष्ट्रातील शेती, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रासाठी एक मोठी संधी आहे. आयोवा विद्यापीठ आणि कृषी विद्यापीठे यांच्या सहकार्यातून अत्याधुनिक तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणले जाईल, असेही फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री भारताची प्रगती पाहवत नाही अशा अनेक शक्ती देशात आहेत. यात काही भारतीय, तर काही बाहेरचेही आहेत. ही मंडळी आपल्याच काही लोकांच्या माध्यमातून, मदतीने आपल्याच काही लोकांना अराजकतेकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. यात काही स्वयंसेवी संस्था (एनजीओ) यांचा टूल म्हणून वापर केला जात आहे. मात्र, भारतात अराजक निर्माण करण्याचे हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. भारताची यशोगाथा अखंडित राहिल असा ठाम विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
रेनॉल्डस् महाराष्ट्राशी भागीदारी करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा करार नवोपक्रमांना चालना देणारा, आर्थिक समृद्धी वाढवणारा आणि जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देणारा धोरणात्मक निर्णय असल्याचे प्रतिपादन आयोवाच्या गव्हर्नर रेनॉल्ड्स यांनी केले.