Organ Donation Pudhari
मुंबई

Maharashtra Organ Donation: अवयवदानात आघाडी; तरीही २० हजार रुग्ण प्रतीक्षेत

महाराष्ट्रात २०२५ मध्ये १५४ अवयवदाते, ४१५ प्रत्यारोपणे; सर्वाधिक गरज किडनीची

पुढारी वृत्तसेवा

अदिती कदम

मुंबई: अवयवदानाबाबत जनजागृती वाढत असली आणि महाराष्ट्र देशातील आघाडीच्या राज्यांपैकी एक असला, तरी अवयवांच्या उपलब्धतेअभावी हजारो रुग्णांना आजही प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

डिसेंबर २०२५ अखेर राज्यात २०,५५३ रुग्ण अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत असून, त्यापैकी १३,०४५ रुग्णांना किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये महाराष्ट्रात १५४ मृत अवयवदाते नोंदविण्यात आले. त्यांच्या माध्यमातून ४१५ अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आले. २०२४ मध्ये १७२ दाते आणि ४५७ प्रत्यारोपणे, २०२३ मध्ये १४८ दाते आणि ४१० प्रत्यारोपणे, तर २०२२ मध्ये १०५ दाते आणि २९७ प्रत्यारोपणे झाली. यावरून अवयवदानाचे प्रमाण वाढले असले तरी प्रत्यक्ष गरजेच्या तुलनेत ते अद्याप अपुरे असल्याचे स्पष्ट होते.

महाराष्ट्रात अवयव वाटप आणि प्रतीक्षा यादीचे व्यवस्थापन झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटरमार्फत केले जाते. रुग्णांची नोंदणी रक्तगट, वैद्यकीय निकष आणि प्राधान्यक्रमानुसार केली जाते.

दरम्यान, अलीकडे प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार भारतात जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत असल्या, तरी देशातील प्रत्यक्ष गरजेच्या तुलनेत अवयवांची उपलब्धता अत्यंत कमी आहे. त्यामुळे मृत्यूनंतर अवयवदानाबाबत जनजागृती वाढविणे आणि अधिकाधिक कुटुंबांनी अवयवदानासाठी पुढे येणे ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT