मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (File Photo)
मुंबई

India Pakistan Tension | महाराष्ट्र हाय अलर्टवर! दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलकडून हल्ल्याची भीती

मुख्यमंत्र्यांनी दिले कोम्बिंग ऑपरेशनचे तसेच सतर्कतेचे आदेश; मुंबई व पुणे शहराला सर्वाधिक धोका

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा धोका निर्माण झाला आहे. युद्धात पाकिस्तान निष्प्रभ ठरत असल्याने राज्यातील दहशतवाद्यांचे स्लीपर सेल सक्रिय होऊन त्यांच्याकडून अंतर्गत हल्ला केला जाण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात ‘कोम्बिंग ऑपरेशन’ करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, महत्त्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात पोलिस, प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेबरोबरच मॉक ड्रिल, ब्लॅकआऊटचा आढावा घेतला. भारत-पाक युद्धामुळे मुंबई आणि पुणे या दोन शहरांना सर्वाधिक धोका आहे. पाकिस्तानकडून दोन्ही शहरे लक्ष्य केली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, दहशतवाद्यांचे स्लीपर सेल सक्रिय होऊन अंतर्गत हल्ले करण्याचीही शक्यता या बैठकीत वर्तविण्यात आली. त्यानुसार मुंबई, पुणे, मुंब्रा, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर आदी संवेदनशील ठिकाणी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविण्याचे निर्देश देत महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढविण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.

राज्यभरात 7 मे रोजी झालेल्या मॉक ड्रिलनंतर आता प्रत्येक जिल्ह्यात मॉक ड्रिल केले जाणार असून, जिल्हास्तरावर वॉररूम स्थापित करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक’चे सखोल अध्ययन करीत सर्वांना त्याची माहिती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक जिल्हाधिकार्‍यास आपत्कालीन फंड तातडीने दिला जाणार असून, याव्यतिरिक्त कोणताही महत्त्वाचा प्रस्ताव आला तर तो एक तासात मंजूर करा, असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यात अधिक समन्वयासाठी मुंबईतील सैन्याचे तिन्ही दल, तसेच कोस्टगार्डच्या प्रमुखांना पुढील बैठकीत व्ही.सी.च्या माध्यमातून निमंत्रित करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नागरी सुरक्षाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रभातकुमार, गृह विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक शिरीष जैन, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT