दिल्ली बॉम्बस्फोटानंतर महाराष्ट्र हाय अलर्ट!  Administrator
मुंबई

Delhi car blast |दिल्ली बॉम्बस्फोटानंतर महाराष्ट्र हाय अलर्ट!

प्रमुख शहरांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था; मंदिरे, रेल्वे स्टेशन, विमानतळांवर सुरक्षा वाढवली

पुढारी वृत्तसेवा

टीम पुढारी

मुंबई/कोल्हापूर/नाशिक/सोलापूर : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी (10 नोव्हेंबर) संध्याकाळी झालेल्या भीषण कार स्फोटानंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. देश हादरवणाऱ्या या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी आहेत. स्फोटानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून देशातील सर्व राज्यांना सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले गेले असून, महाराष्ट्र पोलिस यंत्रणा युद्धपातळीवर सतर्क झाली आहे. राज्यात महत्त्वाच्या शहरांची सुरक्षा लक्षणीयरीत्या वाढवण्यात आली असून, रेल्वे स्थानके, बस स्थानके आणि धार्मिक स्थळे आदींना पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.

दिल्लीत एका उभ्या असलेल्या कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देशात मोठी खळबळ उडाली आहे. या जीवघेण्या स्फोटानंतर महाराष्ट्र्रातील शिर्डीसह प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट आणि विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, पिंपरी-चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील सर्व प्रमुख शहरांत पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत वाहन तपासणी, लॉज तपासणी आणि संशयितांची चौकशी सुरू होती.

त्र्यंबकेश्वर, काळाराम मंदिरात कडेकोट बंदोबस्त

नाशिक : देशभरातील भाविकांची वर्दळ असलेल्या त्र्यंबकेश्वरसह नाशिकच्या काळाराम मंदिर व परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे. तसेच बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात भाविकांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी नियमित सुरक्षा व्यवस्थेसह अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिक येथे 2027 मध्ये कुंभमेळा होत आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. मात्र दिल्ली घटनेच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर व परिसरात कुठलीही अनुचित घटना होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दर दोन तासाला तपासणी

पंढरपूर शहरातील गर्दीची ठिकाणे असलेल्या मंदिर परिसर, दर्शन रांग, चंद्रभागा नदीचे वाळवंट, रेल्वे स्टेशन, बसस्थानक आदी ठिकाणी बीडीडीएस पथकाव्दारे दर दोन तासाला तपासणी करण्यात येत आहे. याकरीता सोलापूर येथील टिम येथे सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली आहे. त्यांच्याकडून कसून तपासणी केली जात आहे.

सागरी गस्त वाढविली

देशाची राजधानी दिल्ली येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी जिल्हा पोलिस विभागाकडून ‌‘अलर्ट‌’ जारी करण्यात आला आहे. कोकणात एकूण 525 लँडिंग पॉईंट आहेत. त्या ठिकाणची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली असून, पोलिस दलाकडून सागरी किनारी गस्त वाढवण्यात आली आहे.

पंढपुरात कसून तपासणी

पंढरपूर : दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची सुरक्षा वाढविली आहे. दर दोन तासाला मंदिरात डॉग स्कॉडद्वारे तपासणी करण्यात येत आहे. राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी आहे. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह कर्मचाऱ्यांची हॅन्ड मेटल, मेटल डिटेक्टरद्वारे कसून तपासणी करण्यात येत आहे.

राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये सुरक्षेत वाढ

  • शिर्डीच्या साईबाबा मंदिरात पोलिसांकडून सर्व प्रवेशद्वारांवर नाकाबंदी सुरू असून, राज्यभरातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. साईदरबारी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी अहमदनगर जिल्हा पोलिस अलर्ट मोडवर आहेत.

  • शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात मेटल डिटेक्टरद्वारे भाविकांची तपासणी करूनच प्रवेश दिला जात आहे. मंदिर परिसरात शीघ्रकृतिदल, सशस्त्र पोलिस आणि स्थानिक पोलिस फौज तैनात आहेत.

  • मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातही भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी पोलिसांसोबत बैठक घेऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

  • तुळजाभवानी मंदिर परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंदिर परिसरात पोलिस व सुरक्षा यंत्रणांची कडक नजर ठेवण्यात आली असून, भाविकांची तपासणी करूनच दर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे.

  • नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातही कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांची करडी नजर प्रत्येक हालचालीवर राहणार आहे.

दिल्ली स्फोटानंतर संभाजीनगर ‌‘हाय अलर्ट‌’वर!

छत्रपती संभाजीनगर शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 19 वर्षांपूर्वी वेरूळला शस्त्रसाठा जप्त केल्यानंतर संभाजीनगरसह मराठवाड्यातील अनेक शहरे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर होती. त्यात संभाजीनगरात येणाऱ्या विदेशी पर्यटकांचा लोढा जास्त असल्याने यावेळी तीच खबरदारी घेण्यात आली. त्यामुळे रात्री वाहनांची तपासणी करण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय विमानतळ, रेल्वेस्थानक, पर्यटनस्थळे येथील बंदोबस्तामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. मागे झालेल्या दहशतवादी कारवायामध्ये ज्या संशयितांचा सहभाग होता, त्यांची नव्याने झाडाझडती करण्याचे आदेश पोलिस यंत्रणेने विविध पथकांना दिल्याचे दिसत आहे. विशेषतः, विमानतळाची सुरक्षा वाढवण्यावर भर दिला जात आहे.

मुंबईत उच्च सतर्कता, सीएसटीवर विशेष पहारा

मुंबई शहरात सुरक्षा यंत्रणा पूर्ण सतर्क मोडवर असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) येथे आरपीएफ आणि जीआरपी संयुक्तपणे प्रवाशांच्या तपासणीत गुंतल्या आहेत. संशयास्पद बॅगा व वस्तूंची तपासणी डॉग स्क्वॉडमार्फत केली जात आहे. तसेच माहीम, रेतीबंदर आणि सागरी किनाऱ्यांवर पोलिसांनी गस्त वाढवली आहे. संशयास्पद नौका किंवा हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

विमानतळांवर तपासणी कडक; प्रवाशांना सूचना

देशातील सर्व विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्रवाशांना उड्डाणाच्या तीन तास आधी विमानतळावर पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चेक-इन आणि बोर्डिंग प्रक्रिया कठोर करण्यात आली असून, फक्त 7 किलो वजनाची एक हँडबॅग नेण्याची परवानगी असेल, अशी माहिती विमान कंपन्यांकडून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT