मुंबई: डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय शरद पवार गटाने घेतल्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गट या मित्रपक्षाने कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीकडे ठाकरे गटाने पाठ फिरवल्यामुळे राज्यातील आघाडीत फूट पडली आहे.
शरद पवार गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी, शुक्रवारी रात्री, शरद पवार गट डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांची शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली.
सगळ्यात आधी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली.
पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा आहे. शरद पवारांचे वय ८६ आहे. संपूर्ण आयुष्य पुरोगामी विचाराला धरून घालवले. अशा नेत्याकडून जातीयवादी, धर्मांध शक्तींशी हातमिळवणी होईल, असे कधीच वाटले नव्हते. पण पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच आहे. हे महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे.
राष्ट्रवादी पक्ष केवळ सत्तेसाठी बनला आहे. सत्तेशिवाय जगणं या पक्षाला मान्यच नाही. सत्तेसाठी जन्माला आले, सत्तेसाठी मरायचचे एवढंच यांच्या डोक्यात आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. भाजप सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय बाप-लेकीने घरातच निर्णय घेतला आहे.
सुप्रिया सुळे यांना सत्तेत सहभागी होऊन मंत्री व्हायचे आहे.१० आमदारांच्या बळावर सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्रिपद मागणं हास्यास्पद आहे.शिवसेनेकडे ६० आमदार असताना शिंदेंना भाजपने मुख्यमंत्रीपद दिलले नाही, मग १० आमदारांवर सुप्रिया सुळेंना देणार का? असा सवाल त्यांनी केला.
महाराष्ट्रद्रोह : संजय राऊत
आमचा पक्ष फुटेल' म्हणून आम्ही पाठिंबा देत आहोत, अशा सुप्रिया सुळे मला म्हणाल्या. त्यावर तुम्हाला पक्ष महत्त्वाचा की देश महत्त्वाचा? असा सवाल मी त्यांना केला, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. ते म्हणाले, आमचाही पक्ष फोडला ? डिलिमिटेशनला पाठिंबा मिळावा म्हणून आमचे सहा खासदार फोडले. म्हणून आम्ही अमित शाहांच्या पायाशी गेलो नाही, मोदींच्या पायाशी गेलो नाही. आम्ही लढत राहिलो.
पवार फसणार नाहीत : सपकाळ
हे विधेयक पास झाले तर देशात प्रादेशिक असमतोल होऊन अराजक माजेल.शरद पवार यांच्या पक्ष इंडिया आघाडीतील मित्र पक्ष आहे. ते विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
शरद पवार यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास शिव, शाहु, फुले व आंबेडकर विचारांचा राहिला आहे. ते भाजपाच्या कुटील डावात अडकणार नाहीत. डिलिमीटेशनला शरद पवार व त्यांचा पक्ष पाठिंबा देणार नाही तर विरोधात मतदान करतील अशी अपेक्षा आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.