मुंबई: राज्यातील 29 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदारयादीच्या कार्यक्रमात राज्य निवडणूक आयोगाने बदल केले आहेत. त्यानुसार आता निवडणुकांकरिता तयार केलेली प्रारूप मतदार यादी 14 ऐवजी 20 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. याशिवाय 27 नोव्हेंबर 2025 रोजी हरकती आणि सूचना दाखल करण्याचा अंतिम दिवस असणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदारयादीवरून महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता तयार केलेली प्रारूप मतदार यादी, हरकती व सूचना मागविण्याकरिता प्रसिद्ध करण्याचा दिनांक आधीच्या सूचनेनुसार 14 नोव्हेंबर होता. तो आता 20 नोव्हेंबर करण्यात आला आहे, तर प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून 5 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येतील.
8 डिसेंबर रोजी या याद्या मतदान केंद्रांच्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येतील, तर 12 डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करू नका!
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातीलच माहिती भरणे आवश्यक आहे. त्यासोबत कोणतीही कागदपत्रे सादर (अपलोड) करण्याची आवश्यकता नाही. संकेतस्थळावर भरलेल्या अर्जाची आणि शपथपत्राची छापील प्रत (प्रिंटआऊट) घेऊन व त्यावर सही करून आवश्यक कागदपत्रांसह तो संपूर्ण संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत जमा करावे,असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. दरम्यान, शनिवारी, 15 नोव्हेंबर रोजी सुटीच्या दिवशी अर्ज स्वीकारण्याच्या सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.