मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, एकूण 2,869 नगरसेवकपदांसाठी आता 15,931 उमेदवार नशीब आजमावत आहेत. मुंबईत सर्वाधिक उमेदवार असून, नव्याने महापालिका झालेल्या इचलकरंजी आणि जालन्यात पहिल्यांदाच ऐतिहासिक मतदान होणार आहे.
राज्याची राजधानी मुंबईत 227 जागांसाठी सर्वाधिक 1,700 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापाठोपाठ पुणे शहरात 165 जागांसाठी 1,166 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे पुण्यात तब्बल 968 उमेदवारांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने तेथे मोठी खळबळ उडाली होती. उपराजधानी नागपुरात 151 जागांसाठी 993 उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
पुण्यात निवडणूक प्रक्रियेत सुरुवातीला 33,427 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील 24,771 अर्ज वैध ठरले, तर 8,840 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. माघार घेण्यामध्ये पुणे (968) अग्रस्थानी असून, त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगर (552) आणि मुंबई (453) यांचा क्रमांक लागतो. सर्वात कमी उमेदवार (230) इचलकरंजी महापालिकेत आहेत.