मुंबई : मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर या महापालिकेत भाजप व शिवसेना युती होणार असल्याचे चित्र असताना अन्य काही महत्त्वाच्या महापालिकांमध्ये युती फिस्कटण्याची शक्यता आहे. पुणे, नाशिक, सोलापूर, अमरावती, मीरा-भाईंदर आदी ठिकाणी युतीची बोलणी यशस्वी न झाल्याने दोन्ही पक्षांनी स्वबळाची तयारी केली आहे. सोलापूरमध्ये भाजपशी बोलणी फिस्कटल्याने शिवसेनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर शिवसेना-भाजप महानगरपालिकेत युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना रविवारी पूर्णविराम मिळाला. त्यानंतर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील युतीच्या हालचालींना वेग आला आहे. महानगरपालिकेतील एकूण १०२ जागांपैकी ५०-५० टक्के जागा वाटपावर दोन्ही पक्षांनी एकमत केल्याचे समजते.
अमरावती महापालिकेत शिवसेनेने भाजपकडे २५ जागांची मागणी केली होती, मात्र हा प्रस्ताव भाजपने नाकारला. भाजपने ८७ जागा स्वतःकडे ठेवत शिवसेनेला १५ ते १६ जागा देण्याची तयारी दाखविली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये युती होऊ शकली नाही ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि भाजप-कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेत युती होणार असताना नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरमध्ये मात्र युती तुटण्याच्या मार्गावर आहे. नवी मुंबईत भाजप नेते वनमंत्री गणेश नाईक यांनी, तर मीरा-भाईंदरमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेला जास्त जागा सोडण्यास नकार दिला आहे. मीरा-भाईंदरमध्ये मेहता यांची ताठर भूमिका पाहता शिवसेना नेते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपला २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. भाजपने तातडीने निर्णय न घेतल्यास शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुका लढण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पनवेलमध्ये शिवसेनेने किमान १० जागांची मागणी केली असताना भाजपने फक्त ३ जागा देण्याची तयारी दाखविली आहे.
नाशिकमध्ये भाजपने एकूण १२२ पैकी ८५ जागांवर दावा केल्याने महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. त्याचवेळी शिवसेना ४६, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ३० जागांची मागणी केल्याने युतीत तणाव वाढला आहे. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मित्रपक्षांना सोबत घेण्यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते दिलेल्या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेतील, असे सांगतानाच वेळ पडल्यास सर्व १२२ जागांवर निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. जळगावमध्येही दोन्ही पक्षांत जागावाटपावर निर्णय झालेला नाही.
पुण्यात शिवसेना २५ जागांवर ठाम असताना भाजपने फक्त १५ जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे पुण्यात शिवसेना -भाजप युती तुटण्याच्या मार्गावर आहे. लाचारी पत्करून भाजपशी युती नको, अशी भूमिका शिवसेना नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पक्षाकडे मांडली आहे. तसेच भाजप निवडून न येणाऱ्या जागा देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.