Maharashtra Monsoon Exit Pudhari
मुंबई

Maharashtra Monsoon Exit: दुष्काळ मागे ठेवून मान्‍सून परत निघाला! आला उशिरा, निघाला मात्र लवकरच

शनिवारी अर्ध्या महाराष्ट्रातून परतीचा प्रवास; मराठवाडा, विदर्भ आणि तळकोकणातूनही दोन-तीन दिवसांत माघार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: ७५ टक्‍के महाराष्‍ट्रात दुष्‍काळ तसाच मागे ठेवून यंदाच्‍या मान्‍सूनने महाराष्‍ट्रातून काढता पाय घेतला आहे. शनिवारी त्याने अर्ध्या महाराष्ट्रातून एक्झिट घेतली. पुढील ४८ तासांत तो महाराष्ट्रातून पूर्णपणे अंग काढून घेईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गेल्या दहा दिवसांपासून मध्य प्रदेश, गुजरातमध्ये अडखळलेला परतीचा मान्सून अवघ्या काही तासांत महाराष्ट्रात आला. मात्र त्याने दिवसभरात ५० टक्के राज्य सोडले. तो आता दक्षिण भारतात जाण्याच्या तयारीत आहे.

यंदा १७ सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थानातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला. मात्र, तो दहा दिवस मध्य प्रदेश व गुजरातमध्येच अडखळला होता. महाराष्ट्रातून तो ५ ते ६ ऑक्टोबरदरम्यान जाईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. परंतु, सर्व अंदाज चुकवत शनिवारीच (दि. ३ ऑक्टोबर) हा परतीचा मान्सून मध्य प्रदेश आणि गुजरातमधून वेगाने महाराष्ट्रात आला.

भारतीय हवामान विभागाने शनिवारी जारी केलेल्‍या प्रसिद्धी पत्रकानुसार पुढील दोन ते तीन दिवसात मानसून मराठवाडा, विदर्भ,तेलंगणाचा काही भाग आणि तळकोकणातून पूर्णपणे बाहेर पडेल.

गेल्या २४ तासांत राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांमधून मान्सून परतला. छत्तीसगड, झारखंड आणि महाराष्ट्रामध्ये तो शनिवारपर्यंत आला होता.

कोकणातील हरणे, पश्चिम महाराष्ट्रातील बारामती आणि मराठवाड्यातील परभणीपर्यंत परतीचा मान्सून परतला आहे. तो पुढील ४८ तासांत केरळ आणि तामिळनाडूच्या दिशेने मार्गक्रमण करेल, असा अंदाज आहे.

या वर्षीच्या मान्सूनचे आगमन उशिरा झाले होते. त्यामानाने त्याचा परतीचा प्रवास मात्र लवकर सुरू झाला आहे. सामान्यपणे १० ऑक्टोबरनंतरच महाराष्ट्रातून मान्सून एक्झिट घेतो. या वर्षी तो ५ ऑक्टोबरपूर्वीच माघारी परतणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT