मुंबई: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जून पासून सुरू होत असून हे अधिवेशन तीन आठवडे चालणार आहे. शेतकरी कर्जमाफी आणि मंत्र्यांचा भ्रष्टाचार प्रकरणावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासन होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाचे सविस्तर वेळापत्रक ठरवण्यासाठी सोमवारी मुंबईत 'कामकाज सल्लागार समितीची' बैठक झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबईत होणार आहे.
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, आगामी पावसाळी अधिवेशनाचे कामकाज एकूण तीन आठवडे चालणार आहे.
या तीन आठवड्यांच्या कालावधीत अनेक महत्त्वाची विधेयके, जनहिताचे प्रश्न आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी पाहता हे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.