मुंबई : शहरी तसेच ग्रामीण भागात माकड तसेच वानरांकडून मनुष्यांवर होणारे हल्ले तसेच घरे, शेतीचे होणारे नुकसान रोखण्यासाठी प्रशिक्षित अशी माणसे नेमण्यात येणार आहेत. ही माकडे पकडल्यानंतर त्यांना वन विभागाने निश्चित केलेल्या जंगलात पुन्हा सोडण्यात येणार आहे. माकड पकडण्यासाठी व्यक्तींना प्रतिमाकड 600 रुपये, त्याबरोबरच पाच माकडांमागे 1000 रुपये प्रवास खर्च दिला जाणार आहे. यासंदर्भात वन विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.
राज्यात ग्रामीण भागात शेती तसेच बागायतींचे माकडे तसेच वानरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जाते. त्याचप्रमाणे शहरी भागांतही माकडांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव वाढला आहे. याला आळा घालण्यासाठी वन व महसूल विभागाकडून महापालिका, नगरपालिका तसेच नगरपंचायतींना निर्देश देण्यात आले आहेत. पकडलेल्या प्रत्येक माकडाचा, वानराचा फोटो किंवा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात येईल. त्याचप्रमाणे पकडण्यात आलेल्या माकडांवर उपचार करून त्यांना मानवी वस्तीपासून दूर म्हणजे 10 किमीपेक्षा अधिक अंतरावर वनक्षेत्रात त्यांच्या अधिवासात सोडण्यात येणार आहे.
माकड पकडणाऱ्यांना 10 माकडांपर्यंत प्रति माकड 600 रुपये तसेच 10 पेक्षा अधिक माकडांसाठी प्रतिमाकड 300 रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम 10 हजारांपेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पाच माकडांपेक्षा अधिक माकडे पकडणाऱ्यांना 1000 रुपये प्रवास खर्चही दिला जाणार आहे.
माकडांना कोणतीही दुखापत न होता केवळ जाळी आणि पिंजरे यांसरख्या सुरक्षित आणि गैर दुखापतकारक पद्धतीचा वापर उपद्रवी माकड/वानर पकडण्यासाठी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच स्थानिक वनरक्षकामार्फत उपद्रवी माकड, वानर यांची संख्या निश्चित करून उपद्रव व्याप्त क्षेत्राचा तपशील, उपद्रव सुरू झाल्याची तारीख व नुकसानीचे स्वरूप यासारखे तपशील नोंदवून अहवाल संबंधित वन उपविभागाचे सहायक वनसंरक्षक यांना सादर करण्यात येणार आहे.