मुंबई: विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून महाराष्ट्रातील पाच जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह बिहार, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. संबंधित मतदारसंघांत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
महाराष्ट्रातील पाच जागांवर थेट लढत
६ डिसेंबर २०२६ रोजी कार्यकाळ संपणाऱ्या पाच विद्यमान सदस्यांच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
औरंगाबाद विभाग पदवीधर चव्हाण सतीश भानूदासराव,पुणे विभाग पदवीधर अरुण गणपती लाड,नागपूर विभाग पदवीधर अभिजित गोविंदराव वंजारी, अमरावती विभाग शिक्षक सरनाईक किरण रामराव, पुणे विभाग शिक्षक जयंत दिनकर आसगावकर यांचा यामध्ये समावेश आहे.
पुणे, नागपूर, अमरावतीकडे विशेष लक्ष
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या राजकारणात पुणे विभागाचे नेहमीच वेगळे महत्त्व राहिले आहे. शिक्षणाचे केंद्र असलेल्या पुण्यातील दोन्ही जागांवर कोणता राजकीय संदेश जातो, याकडे राज्याचे लक्ष असेल.
नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघ आणि अमरावतीतील शिक्षक मतदारसंघातही संघटनात्मक ताकद, उमेदवारांची वैयक्तिक पकड आणि मतदारांशी असलेला थेट संपर्क निर्णायक ठरणार आहे.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातही मराठवाड्यातील बेरोजगारी, शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रश्न निवडणुकीच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.
निवडणुकीचे वेळापत्रक
अधिसूचना : २९ सप्टेंबर
नामनिर्देशनाची अंतिम तारीख : ६ ऑक्टोबर
अर्जांची छाननी : ७ ऑक्टोबर
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ९ ऑक्टोबर
मतदान : २३ ऑक्टोबर, सकाळी ८ ते दुपारी ४
मतमोजणी : २७ ऑक्टोबर
निवडणूक प्रक्रिया पूर्ण : ३१ ऑक्टोबर.