चंदन शिरवाळे
मुंबई: गावठी दारूमध्ये मिश्रण करण्यासाठी मिथेनॉलचा वापर केल्यामुळे आतापर्यंत ४२७ लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनांची दखल घेऊन राज्य सरकार मिथेनॉलच्या खासगी विक्रीवर लवकरच बंदी आणणार आहे.
पुणे जिल्ह्यातील दापोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ मे रोजी संजय नगर झोपडपट्टी, फुगेवाडी, दापोडी येथे तसेच हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळेपडळ येथे मिथेनॉलमिश्रित गावठी दारू सेवन केल्याने १५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मिथेनॉलच्या खासगी विक्रीवर राज्यात बंदी आणण्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागास पत्र पाठविले आहे.
मिथेनॉल म्हणजेच मिथाईल अल्कोहोल. हा पेट्रोलियम उपपदार्थ आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाद्वारे अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या खाली हा पदार्थ प्रतिबंधित किंवा नियंत्रित नाही. तसेच मादक द्रव्याच्या व्याख्येमध्येही त्याचा समावेश नाही. या कारणांमुळे मिथाईल अल्कोहोलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नियंत्रण नाही.
मिथाईल अल्कोहोल हे विष कायदा, १९१९ आणि महाराष्ट्र विष नियमावली, १९७२ अन्वये प्रतिबंधित आहे. हा विष कायदा वर्ग-ब विष प्रकारात मोडतो. त्याचप्रमाणे मिथेनॉलचा समावेश पेट्रोलियम कायद्यान्वये तयार केलेल्या ज्वलनशील पदार्थ संबंधीच्या नियमानुसार वर्ग-अ पदार्थात त्याचा समावेश आहे.त्यामुळे मिथेनॉलवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे नियंत्रण आहे.
मिथेनॉलच्या व्यापारावरील नियंत्रणासाठी अन्न व औषधे प्रशासन विभागाने कायद्यात सुधारणा केलेल्या आहेत. त्यानुसार मिथेनॉलच्या व्यापारावरील नियंत्रणासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून फॉर्म-अ परवाना मंजूर करण्यात येतो.
मिथेनॉल विक्रीपूर्वी खरेदीदाराकडून मिथेनॉलच्या वापराबाबतची खातरजमा केली जाते. औषध निर्मिती व्यतिरिक्त इतर कारणांसाठी मिथेनॉलच्या विक्रीपूर्वी त्यामध्ये प्रति १०० लिटरमागे १ ग्रॅम मिथिलीन कार्माईन आणि ४ ग्रॅम डेनाटोनियम सॅकराईड मिसळण्याबाबत तरतूद आहे. त्यामुळे वैध परवान्याशिवाय मिथेनॉल आढळून आल्यास संबंधित पदार्थ जप्त करण्याची कायद्यात तरतूदही आहे. परंतु, याचा वापर दारूमध्ये मिश्रण करण्यासाठी होत असल्याचे काही घटनांवरून उघडकीस आले आहे.
मुंबईतील छाया बार दुर्घटनेच्या अनुषंगाने नेमण्यात आलेल्या पार्थसारथी समिती आणि २०१५ मध्ये मालवणी दारू दुर्घटनेच्या चौकशीसाठी गठीत बक्षी समितीने, मिथेनॉलच्या वाहतूक, वितरण व खरेदी-विक्रीच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कठोर अंमलबजावणीबाबत शिफारशी केल्या होत्या. परंतु, अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नसल्याकडे उत्पादन शुल्क विभागाने या पत्राद्वारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे या विभागाने मिथेनॉलच्या खासगी वितरणावर बंदीबाबत पावले उचलली आहेत.
मिथेनॉलमिश्रित विषारी दारूच्या सेवनामुळे राज्यात कित्येक वेळा दुर्घटना घडलेल्या आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे.
राज्यात घडलेल्या दुर्घटना
१९६८-६९. खोपोली, जिल्हा रायगड येथे फ्रेंच पॉलीशच्या सेवनामुळे दुर्घटना घडली. त्यावेळी ९० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू.
१९९१. मुंबईतील छाया बारमध्ये मिथेनॉलमिश्रीत देशी दारूच्या सेवनामुळे ९५ जण मृत्यू.
डिसेंबर २००४ व जानेवारी २००५ मुंबईतील सातरस्ता व विक्रोळी येथे मिथेनॉलमिश्रीत हातभट्टी दारूच्या सेवनामुळे १०४ जणांचा मृत्यू.
२००९. पाली, जि. रायगड येथे मिथेनॉलमिश्रीत हातभट्टी दारुच्या सेवनामुळे १० जणांचा मृत्यू.
मुंबईतील मालवणी भागात जून २०१५ मध्ये मिथेनॉलमिश्रीत हातभट्टी दारूच्या सेवनामुळे १०४ जणांचा मृत्यू.
अहिल्यानगर जिल्ह्यातील २०१७ पांगरमल येथे मिथेनॉलमिश्रीत बनावट दारूच्या सेवनामुळे ९ जणांचा मृत्यू.