Mental Hospital Vacancies Pudhari
मुंबई

Mental Hospital Vacancies: राज्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयांत ४९४ पदे रिक्त! मंजूर २,१९६ पदांपैकी १,७०२ पदे भरली

पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्नागिरी येथील रुग्णालयांत २,१९६ मंजूर पदांपैकी १,७०२ पदे भरली; वैद्यकीय आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची कमतरता कायम

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील मानसिक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात असले, तरी प्रादेशिक मनोरुग्णालयांमधील मनुष्यबळाची कमतरता कायम आहे.

पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्नागिरी येथील चार प्रादेशिक मनोरुग्णालयांमध्ये मंजूर २,१९६ पदांपैकी १,७०२ पदे भरली असून, तब्बल ४९४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे मनोरुग्णांच्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, पुणे प्रादेशिक मनोरुग्णालयात ९५४ मंजूर पदांपैकी ७७१ पदे भरली असून, १८३ पदे रिक्त आहेत. ठाणे येथे ७२३ मंजूर पदांपैकी ५४३ पदे भरली असून, १८० पदे रिक्त आहेत. नागपूरमध्ये ३७५ मंजूर पदांपैकी २९९ पदे भरली असून, ७६ पदे रिक्त आहेत, तर रत्नागिरी येथील रुग्णालयात १४४ मंजूर पदांपैकी ८९ पदे भरली असून, ५२ पदे रिक्त असल्याची नोंद आहे.

गट-डमध्ये सर्वाधिक रिक्त पदे

चारही मनोरुग्णालयांतील पदांच्या वर्गवारीनुसार, गट-अ मधील १०३ मंजूर पदांपैकी २६, गट-ब मधील २४ पैकी २०, गट-क मधील ६५५ पैकी १०३ आणि गट-ड मधील १,४१४ पैकी ३४५ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, गट-डमधील रिक्त पदांची संख्या सर्वाधिक आहे. एकूण रिक्त पदांपैकी मोठा हिस्सा या संवर्गातील आहे.

मानसिक आजारांवरील उपचारांसोबतच रुग्णांचे पुनर्वसन, व्यवसाय प्रशिक्षण आणि दैनंदिन जीवनात पुन्हा स्थिर होण्यासाठी मदत केली जाते. अशा परिस्थितीत मंजूर पदे पूर्ण क्षमतेने भरणे आणि रुग्णालयांतील सेवा अधिक सक्षम करणे महत्त्वाचे ठरत आहे.

५,६९५ खाटांची क्षमता

राज्यातील चार प्रादेशिक मनोरुग्णालयांची एकूण क्षमता ५,६९५ खाटांची आहे. पुणे येथे २,५४०, ठाणे येथे १,८५०, नागपूर येथे ९४० आणि रत्नागिरी येथे ३६५ खाटांची क्षमता आहे. या रुग्णालयांत बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण सेवा, औषधोपचार, समुपदेशन, व्यसनमुक्ती उपचार तसेच आवश्यकतेनुसार विशेष उपचार दिले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT