महाराष्ट्र सागरी सुरक्षेची तटबंदी होणार भक्कम pudhari photo
मुंबई

Coastal Security : महाराष्ट्र सागरी सुरक्षेची तटबंदी होणार भक्कम

पोलिसांना मिळणार 30 नवीन बोटी; खरेदीसाठी निविदा प्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा

राजन शेलार

मुंबई :समुद्रातून होणाऱ्या अतिरेकी कारवाया तसेच तस्करीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेला 30 नवीन बोटी मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात 20 बोटींच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. या व्यतिरिक्त 21 नवीन डिंगी प्रकारच्या बोटी खरेदी करण्याचा प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयाने सरकारला पाठविला आहे. यामुळे राज्याच्या सागरी सुरक्षेची तटबंदी भक्कम होणार आहे.

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेेसाठी केलेल्या अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये पोलिस बोट सागरी गस्त, सागरी पोलीस ठाणे, सागरी चेकपोस्ट कार्यरत असून सागरी जेट्टींवर सागरी ऑपरेशनल रूमसह अन्य सुविधांचा समावेश आहे. राज्याला 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा व 842 किमी लांबीचा खाडी किनारा लाभलेला आहे. सागरी सुरक्षेची संरचना ही त्रिस्तरीय पध्दतीची असुन त्यामध्ये सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी भारतीय नौदलाची आहे. त्यांना साहाय्य करण्यासाठी किनाऱ्यापासून 2 नॉटीकल मैलांपर्यंतचे कार्यक्षेत्र तटरक्षक दलाकडे तर 0 ते 12 नॉटीकल मैलांपर्यंतचे कार्यक्षेत्र राज्याच्या सागरी पोलिसांकडे देण्यात आले आहे.

उपलब्ध बोटी वारंवार नादुरुस्तमुळे गस्तीवर परिणाम

सागरी सीमेचे संरक्षण करण्यासाठी सागरी सुरक्षा पोलीसांकडे 55 बोटी आहेत. त्या बोटी 2008 ते 2012 या काळातील असून या बोटींचे आयुर्मान 10 वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्या वारंवार नादुरुस्त होतात. प्रत्यक्षात सागरी गस्तीसाठी कमी बोटी उपलब्ध होत असल्याने सागरी सुरक्षेवर परिणाम होतो.

30 नवीन बोटी खरेदीचा प्रस्ताव

पोलीस महासंचालक कार्यालयाने 30 नवीन बोटी खरेदीचा प्रस्ताव शासनाला पाठविला. पहिल्या टप्प्यात 20 बोटी खरेदी केल्या जाणार आहेत. बोटी पुरविण्यासाठी तीन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार मच्छिमार ट्रॉलर्सही भाडेतत्वावर घेतले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT