मतदारांना आमिष दाखविणारी वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांचा अहवाल मागविला (Pudhari Photo)
मुंबई

local body elections : मतदारांना आमिष दाखविणारी वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांचा अहवाल मागविला

एकनाथ शिंदे, अजित पवारांसह 20 जणांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार संपला असून मंगळवारी मतदान होणार आहे. मात्र निवडणूक प्रचार काळात अनेक नेत्यांकडून मतदारांना आर्थिक प्रलोभने दाखवणारी वक्तव्ये करण्यात आली आहेत. अशा वक्तव्यांची राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून त्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला आहे.

अशा नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, जयकुमार गोरे, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा समावेश आहे. त्यामुळे या नेत्यांना मतदारांना आर्थिक प्रलोभने दाखवणारी वक्तव्ये भोवण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत प्रलोभने दाखवणाऱ्या 20 नेत्यांच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी संबंधित नेत्यांनी वक्तव्ये केली आहेत, त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तत्काळ अहवाल मागवला आहे.

अजित पवार यांच्याकडून निधीला कात्री लावण्याबाबत वक्तव्य करण्यात आले होते. ‌‘तुमच्याकडे मत, तर माझ्याकडे निधी‌’ अशा आशयाचे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. तर गुलाबराव पाटील यांनी लक्ष्मी दर्शन होणार अशा आशयाचे वक्तव्य केले होते. एकनाथ शिंदे यांनी तिजोरीच्या चाव्यासंदर्भात विधान केले होते; तर ‌‘खा कुणाचेही मटण, पण दाबा कमळाचे बटण‌’ असे विधान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केल्याची तक्रार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT