मुंबई : राज्यातील बिबट्यांची वाढती संख्या आणि बिबट्यांचे मानवी वस्तींवर होणारे हल्ले रोखण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्या नसबंदीचा पर्याय पुढे आणला आहे. बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी यांनी दिली. दरम्यान, चालू वर्षात १३ वाघांचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
वन मंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर गणेश नाईक यांनी मंगळवारी मंत्रालयात पहिलीच पत्रकार परिषद घेतली. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी चार दिवसांपूर्वी बिबट्यांच्या नसबंदीबाबत आपल्याला पत्र दिले आहे. या नसबंदीसाठी केंद्र सरकारची परवानगी लागते. सध्या राज्यात बिबट्यांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. जुन्नर आणि आंबेगाव परिसरात गेल्या १५ ते २० वर्षांत मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाल्याने ऊस तोडल्यानंतर त्यांचा अधिवास संपतो आणि ते मानवी वस्तीत जातात. त्यामुळे बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी नसबंदी हा एक उपाय आहे. त्यासाठी गरज पडल्यास केंद्रीय मंत्र्यांशी चर्चाही करू, असे ते म्हणाले. वन्य प्राण्यांच्या मानवी वस्तीतील वावराबाबत ते म्हणाले, राज्यात वन्यप्राणी आणि शेतकरी यांच्यातील संघर्षही वाढला आहे. वन्य प्राण्यांमुळे शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत असून या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भरपाईत सुधारणा करण्याची गरज असेल तर ती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ब्रिटीशांनी वृक्षलागवड करताना अनेक बाबींचा विचार केला. तो विचार पुन्हा अंमलात आणण्याची गरज आहे. वनांमध्ये वनभाज्या आणि फळे मुबलक प्रमाणात मिळाली तर त्यावर जगणारे प्राणी वाढतील आणि शिकारी प्राणी जंगलात राहतील. यासाठी केवळ झाडे लावायची म्हणून लावू नका तर फळझाडे लावण्यासाठी प्राधान्य दिले पाहिज, असे ते म्हणाले.
नागपूर येथील गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात डिसेंबर महिन्यात ३ वाघ आणि एका बिबट्याच्या मृत्यूचीही माहिती त्यांनी दिली. प्राणीसंग्रहालयात बीफऐवजी कोंबडीचे मांस दिले. त्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने वाघांचा मृत्यू झाला असून याची चौकशी होईल. काही ठिकाणी डुकरांची शिकार करण्यासाठी लावलेल्या सापळ्यांत वाघ अडकल्याने काही वाघांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.