ITI Admission Pudhari
मुंबई

ITI Admission: आयटीआयच्या चार फेऱ्यानंतरही ६१ हजारांहून जागा रिक्त

८५ हजार ९९५ विद्यार्थ्यांचा प्रवेश; संस्थास्तरीय समुपदेशन फेरीच्या प्रतिसादाकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेत चार केंद्रीय प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र १ लाख ४७ हजार ५४८ जागांपैकी केवळ ८५ हजार ९९५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.

त्यामुळे तब्बल ६१ हजार ५५३ जागा अद्याप रिक्त राहिल्या आहेत. प्रवेशाच्या चार फेऱ्यांनंतरही ४१.७२ टक्के जागा रिकाम्याच राहिल्या असून आता संस्थास्तरीय समुपदेशन फेरीत विद्यार्थ्यांचा प्रवेशाला कसा प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष लागले आहे.

राज्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमधील प्रवेशासाठी यंदा एकूण १ लाख ७० हजार ३९९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यामध्ये १ लाख ४२ हजार ५९२ मुले आणि २७ हजार ८०७ मुलींचा समावेश होता.

गेल्या वर्षी अर्जदारांची संख्या १ लाख ७३ हजार ६७३ होती. त्याच्या तुलनेत यंदा प्रवेश प्रक्रियेच्या सुरुवातीलाच अर्जदारांची संख्याही ३ हजार २७४ ने घटली होती.

गेल्या वर्षीच्या तुलनेत जरी यंदा प्रवेश वाढल्याचे संचालनालयाकडून सांगितले जात असले तरी अर्जदारांची संख्या कमी झाल्याचा परिणामही त्या तुलनेत प्रवेश प्रक्रियेवरही दिसून आला आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी आता लॉगिन करून ९ व १० ऑगस्ट या काळात नोंदणी करावी लागणार आहे.

त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी संस्थानिहाय गुणवत्ता यादी आणि समुपदेशनाचा वेळ जाहीर केला जाईल. १२ व १३ ऑगस्ट रोजी संबंधित आयटीआयमध्ये प्रत्यक्ष समुपदेशन होऊन गुणवत्ता, उपलब्ध जागा प्रवेश निश्चित करण्यात येतील.

प्रवेशाचे प्रमाण ७० %

आयटीआयमध्ये यंदा ९६ हजार ५३२ जागांपैकी ६७ हजार ६४३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून २८ हजार ८८९ जागा रिक्त आहेत. त्यामुळे सरकारी आयटीआयमधील प्रवेशाचे प्रमाण ७०.०८ टक्के इतके राहिले आहे.खासगी आयटीआयमध्ये ५१ हजार १६ जागांपैकी केवळ १८ हजार ३५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून तब्बल ३२ हजार ६६४ जागा रिक्त आहेत.

खासगी आयटीआयमधील प्रवेशाचे प्रमाण ३५.९७ टक्के राहिल्याने निम्म्याहून अधिक जागा भरल्या नसल्याचे दिसून आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी आता लॉगिन करून ९ व १० ऑगस्ट या काळात नोंदणी करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT