HSC Exam File Photo
मुंबई

Maharashtra HSC Exam Cheating: बारावीच्या पहिल्याच दिवशी 42 विद्यार्थी कॉपी करताना पकडले; अमरावतीत सर्वाधिक 22 प्रकरणे

इंग्रजी पेपरदरम्यान भरारी पथकांची कारवाई; कॉपीमुक्त मोहिमेलाच पहिल्या दिवशी तडा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यात बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी गैरप्रकारांचे सावट पुन्हा एकदा समोर आले आहे. इंग्रजीच्या पहिल्या पेपरलाच राज्यभरातून तब्बल 42 विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये अमरावती विभागात सर्वाधिक 22 प्रकरणे नोंदली गेल्याने मंडळाच्या कॉपीमुक्त मोहिमेलाच पहिल्याच दिवशी तडा गेल्याचे चित्र आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांवर थेट दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल, असा कडक इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यापूर्वीच दिला होता. गैरप्रकाराला उद्युक्त करणारे किंवा मदत करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र या इशाऱ्यानंतरही गैरप्रकार पूर्णपणे आटोक्यात आलेले दिसत नाहीत. मंगळवारपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील 9 विभागीय मंडळांतर्गत परीक्षा केंद्रांवर इंग्रजीचा पहिला पेपर पार पडला. या दिवशीच भरारी पथकांच्या कारवाईत 42 विद्यार्थ्यांना गैरप्रकार करताना पकडण्यात आले. यामध्ये अमरावती विभागात तब्बल 22 प्रकरणे नोंदली गेली असून, पुणे विभागात 10 विद्यार्थ्यांना पकडण्यात आले आहे.

राज्यातील 3 हजार 387 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरू आहे. राज्यातील 10 हजार 664 कनिष्ठ महाविद्यालयांमधील एकूण 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थी यंदा परीक्षेला बसले आहेत. कॉपीमुक्त परीक्षा अभियानांतर्गत यंदा मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली असली, तरी पहिल्याच दिवशी गैरप्रकारांची नोंद झाल्याने या मोहिमेच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परीक्षेदरम्यान प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून, या पथकांनी अचानक तपासण्या करून विद्यार्थ्यांना गैरप्रकार करताना रंगेहात पकडले.

अमरावतीनंतर पुणे विभागात 10, नाशिकमध्ये 4, छत्रपती संभाजीनगरमध्ये 3, लातूरमध्ये 2 आणि नागपूरमध्ये 1 प्रकरण नोंदले गेले. मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभागात मात्र एकही गैरप्रकार आढळलेला नाही. महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ मलप्रॅक्टिस ॲक्ट, 1982 नुसार कॉपी करताना पकडलेल्या विद्यार्थ्यावर थेट दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. विद्यार्थ्यांनी अशा गैरप्रकारांपासून दूर राहावे, असे आवाहन राज्य मंडळाने पुन्हा एकदा केले आहे.

विभागनिहाय गैरप्रकार प्रकरणे

पुणे 10

नागपूर 1

छ. संभाजीनगर 3

मुंबई 0

कोल्हापूर 0

अमरावती 22

नाशिक 4

लातूर 2

कोकण 0

एकूण 42

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT