मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली चार कंपन्यांसोबत वीज निर्मितीचे सामंजस्य करार करण्यात आले. याप्रसंगी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन यांच्यासह आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके उपस्थित होते.  pudhari photo
मुंबई

Historic hydropower agreements : जलविद्युत प्रकल्पांसाठी राज्याचे ऐतिहासिक करार

31 हजार 955 कोटींची गुंतवणूक, 6,450 मेगावॅट क्षमतेची वीजनिर्मिती, 15,000 रोजगार संधी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्राच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प (पंप स्टोरेज) क्षेत्राला नवे बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचे चार सामंजस्य करार करण्यात आले. या सामंजस्य करारामुळे नवीकरणीय ऊर्जा निर्मितीसह औद्योगिक व सामाजिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य हे पंप स्टोरेज प्रकल्पात देशात अग्रणी राज्य ठरले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

विधानभवन येथील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पांद्वारे एकूण 6 हजार 450 मेगावॅट क्षमतेची वीजनिर्मिती अपेक्षित असून, सुमारे 31 हजाए 955 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 15,000 रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राने पंप स्टोरेज धोरणामध्ये खूप गतिशील धोरण स्वीकारले असून, प्रकल्पांची संख्या, गुंतवणूक आणि प्रस्तावित वीजनिर्मितीच्या बाबतीत संपूर्ण देशात आघाडी घेतली असून, नवीकरणीय ऊर्जेकडे वाटचाल करत आहोत. 2030 पर्यंत 50 टक्केपेक्षा अधिक वीज नवीकरणीय स्त्रोतांमधून मिळवण्याचा निर्णय घेतला आहे. सौरऊर्जा आणि पंप स्टोरेजद्वारे वीजनिर्मितीवर भर देण्यात येत असून, ग्रीडची स्थिरता राखण्यासाठी पंप स्टोरेज ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्रात सौरऊर्जेमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू झाली आहे. त्याशिवाय इतर पर्यायी वीजनिर्मितीच्या क्षेत्रातही काम सुरू आहे.

गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये भौगोलिक परिस्थितीमुळे एक लाख मेगावॉट सौरऊर्जेची निर्मिती शक्य आहे. महाराष्ट्रात मात्र भौगोलिक मर्यादेमुळे 30 ते 50 हजार मेगावॉट इतकीच सौरऊर्जा निर्माण शक्य आहे. सह्याद्री पर्वतरांगांमुळे पंप स्टोरेज क्षेत्रामध्ये प्रचंड क्षमता आहे. या क्षमतेचा उपयोग करून घेतला जात आहे. जलसंपदा विभागाने एक लाख मेगावॉट क्षमतेच्या पंप स्टोरेज प्रकल्पांचे दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवले असून, विविध उद्योगसमूहांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता हे उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

चार कंपन्यांबरोबर सामंजस्य करार

राज्य सरकारने 20 डिसेंबर 2023 रोजी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर उदंचन जलविद्युत प्रकल्पांची उभारणी करण्याचे धोरण जाहीर केले होते. याच धोरणाच्या अनुषंगाने चार कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले.

ग्रीनको एमएच-01 आयआरईपी प्रा. लिमिटेड

नयागाव ऑफ स्ट्रीम क्लोजलूप उदंचन जलविद्युत प्रकल्प, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर - स्थापित क्षमता - 2 हजार मेगावॅट

गुंतवणूक - 9,600 कोटी रोजगार निर्मिती - 6 हजार

ऋत्विक कोल्हापूर पीएसपी प्रा. लिमिटेड - ऑफस्ट्रिम क्लोजलूप उदंचन जलविद्युत प्रकल्प, ता. चांदगड, जि. कोल्हापूर

स्थापित क्षमता (मे.वॅ) - 1 हजार 200 मेगावॅट

गुंतवणूक - 7 हजार 405 कोटी

रोजगार निर्मिती - 2,600

अदानी हायड्रो एनर्जी टेन लिमिटेड - अडनदी उदंचन जलविद्युत प्रकल्प, ता. चिखलदरा, जि. अमरावती

स्थापित क्षमता - 1 हजार 500 मेगावॅट

गुंतवणूक - 8 हजार 250 कोटी

रोजगार निर्मिती - 4,800

मे. वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड - कासारी- मुचकुंदी उदंचन जलविद्युत प्रकल्प, ता. लांजा, जि. रत्नागिरी

स्थापित क्षमता - 1 हजार 750 मेगावॅट

गुंतवणूक - 6 हजार 700 कोटी

रोजगार निर्मिती - 1,600

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT