मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने उच्च शिक्षण अंतर्गत असलेल्या सहा अभ्यासक्रमांच्या सध्या सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. विधी-पाच वर्षे, विधी-तीन वर्षे, बीपीएड, एमपीएड, बीएड-एमएड आणि एमएड या अभ्यासक्रमांची संस्थात्मक प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून त्यासाठी विद्यार्थी 3 ते 5 ऑक्टोबरदरम्यान अर्ज दाखल करू शकणार आहेत. 6 ऑक्टोबरला महाविद्यालये गुणवत्ता यादी जाहीर करणार असून विद्यार्थ्यांना 8 ऑक्टोबरपर्यंत महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचे आहेत.
राज्यातील विविध भागात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना संस्थास्तरीय प्रवेश फेरीत सहभागी होता आले नाही. तसेच अर्ज भरण्यात अनेक उमेदवारांकडून पात्रतेच्या गुणांबाबत चुका झाल्याचे लक्षात आल्याने राज्य सीईटी कक्षाने सहा अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत संस्थास्तरीय प्रवेशासाठी अर्ज, दुरुस्ती व प्रवेश निश्चितीची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
बीएड प्रवेश प्रक्रियेत राज्यातील 481 महाविद्यालये आहेत. यामध्ये एकूण 36 हजार 553 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 76 हजार 432 विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केली होती. त्यापैकी 72 हजार 426 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केले होते. तर 43 हजार 108 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पर्याय भरले होते. परंतु आत्तापर्यंत केवळ 21 हजार 929 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर प्रवेशाच्या अद्यापही 14 हजार 624 जागा रिक्तच आहेत.
एमएड प्रवेश प्रक्रियेत राज्यातील 55 महाविद्यालयांत 2 हजार 925 जागा उपलब्ध आहेत. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत 2 हजार 495 विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केली होती. त्यापैकी 2 हजार 294 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 1 हजार 526 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर प्रवेशाच्या अद्यापही 1 हजार 399 जागा रिक्तच आहे.
बीपीएड प्रवेश प्रक्रियेत राज्यातील 57 महाविद्यालयांत 6 हजार 175 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत 4 हजार 557 विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केली होती. त्यापैकी 4 हजार 324 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 3 हजार 513 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर प्रवेशाच्या अद्यापही 2 हजार 662 जागा रिक्तच आहेत.
एमपीएड प्रवेश प्रक्रियेत राज्यातील 32 महाविद्यालये सहभागी झाली आहेत. एकूण 1 हजार 15 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत 1 हजार 687 विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केली होती. त्यापैकी 1 हजार 609 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 881 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर प्रवेशाच्या अद्यापही 134 जागा रिक्तच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बीए-बीएड आणि बीएस्सी बीएड या एकात्मिक अभ्यासक्रमांसाठी 383 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर 355 विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले आहेत. यामध्ये बीए-बीएड अभ्यासक्रमाची पाच महाविद्यालये सहभागी झाली आहेत. यामध्ये अभ्यासक्रमाच्या 353 जागा उपलब्ध आहेत. त्यातील 215 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून 138 जागा रिक्त राहिल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बी.एड-एम.एड या तीन वर्षांच्या एकात्मिक अभ्यासक्रमासाठी यंदा एका महाविद्यालयात 55 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 424 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 312 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केले आहेत. परंतु 55 जागांपैकी केवळ 16 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून प्रवेशाच्या 39 जागा अद्यापही रिक्तच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिक्षणशास्त्र शाखेच्या विविध अभ्यासक्रमांना घरघर लागली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तीन व पाच वर्षे विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये तीन वर्षांसाठी 217 महाविद्यालयांमध्ये एकूण 23 हजार 729 जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी 59 हजार 301 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर 53 हजार 990 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केले. कॅप तसेच व्यवस्थापन कोटा मिळून 22 हजार 612 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर 1 हजार 117 जागा रिक्त राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच वर्षांसाठी 161 महाविद्यालयांमध्ये एकूण 13 हजार 589 जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी 17 हजार 866 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर 16 हजार 14 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केले. कॅप तसेच व्यवस्थापन कोटा मिळून 10 हजार 26 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. 3 हजार 563 जागा रिक्त राहिल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे व इतर तांत्रिक कारणांमुळे अनेक विद्यार्थी विधी, बीपीएड, एमपीएड, एमएड व बीएड-एमएड या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ शकले नाहीत. त्या सर्व विद्यार्थ्यांना ही एक संधी देण्यात आली आहे.दिलीप सरदेसाई, आयुक्त, सीइटी सेल
25 सप्टेंबरला मुदत संपली असल्याने अनेक विद्यार्थी विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित होते. विधी अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होवू नये, यासाठी सीईटीसेलकडे पाठपुरावा केल्यानंतर मुदतवाढ करण्यात आल्याने याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.अॅड. वैभव थोरात, शिवसेना, सचिव