मुंबई : राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांना मोठा फटका बसला असून, हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. पावसाच्या अस्मानी संकटामुळे 30 जिल्ह्यांमधील 195 तालुक्यांतील तब्बल 62 लाख 17 हजार 540 एकर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यांत पाहणी दौरे करत असून, अधिकार्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री दत्तात्रय भरणे हे नागपूर दौर्यावर असून, तेथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जमीन वाहून गेल्याने पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत.
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल 30 जिल्ह्यांतील 195 तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे 654 महसूल मंडलांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, असे त्यांनी सांगितले.