Maharashtra heatwave pudhari photo
मुंबई

Maharashtra heatwave: राज्यभर उष्णतेचा कहर; वर्ध्याचा पारा विक्रमी 45 अंशांवर!

मुंबईत तापमान घटले तरी उकाडा वाढला; ढगाळ वातावरणाचा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई परिसरात तापमानात किंचित घट, पण ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) मुंबई केंद्राच्या सांताक्रूझ वेधशाळेमध्ये रविवारी किमान 25 आणि कमाल 34 अंश सेल्सिअस तापमान होते. कुलाबा वेधशाळेमध्ये 26 आणि 33 अंश सेल्सिअस अशी नोंद झाली. दोन्ही वेधशाळांमधील कमाल तापमानाचा आढावा घेतल्यास उपनगरांच्या तुलनेत शहरामध्ये उन्हाचा तडाखा कमी जाणवला.

राज्यात रविवारी उष्णतेची लाट तीव्र झाली असून, विदर्भातील वर्धा येथे पारा रविवारी विक्रमी 45 अंशांवर गेला. अनेक शहरांमध्ये तापमानाने 40 अंशांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, येत्या तीन दिवसांकरिता हवामान विभागाने पावसाचा इशारा दिल्यामुळे सर्वांगाचा दाह करणाऱ्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे 20, 21 आणि 22 एप्रिलदरम्यान ढगाळ वातावरण तयार होऊन पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपासून विदर्भातील अकोला, नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांत उष्णतेचा जोर कायम आहे. दरम्यान, अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामध्ये 45 वर्षीय महिलेचा आणि अमरावतीत 65 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, शासकीय पातळीवरून यास दुजोरा मिळाला नाही.

मुंबईत शनिवारच्या तुलनेत तापमानात किंचित घट झाली तरी मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरणामुळे दुपारी उन्हाची तीव्रता थोडी कमी झाली तरी उकाडात वाढला आहे. सांताक्रूझ वेधशाळेमध्ये 70 आणि कुलाबा वेधशाळेमध्ये 83 टक्के आर्द्रतेची नोंद झाली.

शाळा आणि कॉलेजना सुट्टी पडल्याने त्यातच रविवार असल्याने काल मुंबईत समुद्रकिनारी गर्दी पाहायला मिळाली. मात्र, सायंकाळनंतर त्यात आणखी वाढ झाली.

यूपी, राजस्थानात उष्णतेचा प्रकोप

उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. पूर्व उत्तर प्रदेशातील वाराणसी, प्रयागराज, मिर्झापूर आणि गोरखपूर जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून तापमान विक्रमी पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्येही तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

प्रमुख शहरांतील कमाल तापमान

वर्धा 45, अकोला 44.6, चंद्रपूर 44.2, नागपूर 43.8, अमरावती 43.5, यवतमाळ 43, जळगाव 42.8, पुणे 41.5, नाशिक 40.9, मुंबई 34.5.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT