मुंबई : पुढारी वृत्तसेवा
ऐन मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच राज्यातील तापमानाचा पारा चांगलाच वाढल्याने उष्णतेचा कहर सुरू आहे. राज्यात बुधवारी अकोला जिल्ह्याचे कमाल तापमान ३९.५ अंशांवर पोहोचले, तर मुंबईचा पारा ३८ वर चढला होता.
दक्षिण भारताकडून येणाऱ्या दमट आणि उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट येणार असून, पारा ४० अंशांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, धुळे, अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यांत उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, विदर्भ, कोकण या भागातील बहुतांश जिल्ह्यांत पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येणार असून, दक्षिण भारताकडून राज्याकडे दमट आणि उष्ण वारे वाहू लागल्याने ही परिस्थिती निर्माण होत आहे. त्यातच हवामान कोरडे राहणार असल्यामुळे उन्हाच्या तीव्रतेत वाढ होईल, असाही अंदाज आहे.