Maharashtra health committees revival Pudhari
मुंबई

Health Services: आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे प्रशासनाला निर्देश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर देखरेख करण्यासाठी असलेल्या विविध समित्यांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. नागरिकांना अधिक चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी रुग्ण कल्याण समिती, महिला आरोग्य समिती, ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती या समित्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून आरोग्यसेवा दिल्या जातात. या लोकहिताच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आरोग्य समित्यांची भूमिका महत्त्वाची असते.

ग्रामीण भागासाठी ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती व शहरी भागासाठी महिला आरोग्य समितीच्या माध्यमातून स्वच्छता, पोषण, तसेच प्राथमिक आरोग्य सेवेत महत्त्वाची भूमिका बजातात, तर जन आरोग्य समिती व रुग्ण कल्याण समित्या आरोग्य संस्थांमध्ये रुग्णकेंद्रित सेवा, सेवेची गुणवत्ता व निधीच्या पारदर्शक वापरासंबंधी लक्ष ठेवण्याची भूमिका बजावतात.

या समित्यांमध्ये संबंधित पातळीवरील लोकप्रतिनिधी, आरोग्य क्षेत्रातील विविध घटकांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि सजग नागरिकांचा सहभाग असतो.

या सर्व समित्यांच्या पुनरुज्जीवन करण्याच्या प्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच समाजातील सेवाभावी नागरिक यांनी सहभागी व्हावे.आरोग्यसेवा अधिक परिणामकारक होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून, समित्यांच्या माध्यमातून स्थानिक गरजा ओळखून अंमलबजावणी, तसेच त्रुटीबाबत त्वरित उपाययोजना केल्यास नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देऊन, नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास दृढ होईल, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सहकार्य

सर्व लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य यांनी या प्रक्रियेत सहभाग घ्यावा. राज्यातील या महत्त्वपूर्ण उपक्रमात सहभागी होऊन आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही आरोग्य मंत्र्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT