मुंबई: मुंबईतील सर जे. जे. महानगर सरकारी रक्तपेढीतील कथित रक्तचोरी आणि आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणाची दखल घेत राज्य सरकारने राज्यातील सर्व रक्तपेढ्यांचे ऑडिट आणि 'क्यूआर कोड' ट्रॅकिंग प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेणार आहे, अशी माहीती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. भाजपा विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
बोर्डीकर म्हणाल्या, प्राथमिक चौकशीमध्ये जे. जे. रक्तपेढीचे प्रमुख डॉ. हितेश पगारे आणि वैद्यकीय सामाजिक अधिकारी भिसे हे प्रथमदर्शनी दोषी आढळले आहेत. त्यामुळे शासनाने त्यांची सेवा तात्काळ समाप्त करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्याविरुद्ध लवकरच फौजदारी गुन्हे (एफआयआर) दाखल करण्यात येतील.
वाघ म्हणाल्या, चिंचपोकळी येथील रक्तदान शिबिरातून संकलित झालेल्या १२८ रक्तपिशव्यांपैकी ५५ रक्तपिशव्या कोणतीही पूर्वपरवानगी अथवा अधिकृत नोंद न करता बदलापूर येथील 'माया रक्तपेढी' या खासगी केंद्राकडे पाठविण्यात आल्या.
तसेच, सरकारी यंत्रणेचा गैरवापर, नियमबाह्य सवलती देऊन प्रति रक्तपिशवी ६६५ रुपयांच्या दराने पुरवठा आणि खासगी संस्थांकडून झालेली नफेखोरी झाली आहे. याशिवाय गरीब रुग्ण, थॅलेसेमिया व सिकलसेल रुग्णांना होणारा त्रास, डोनर कार्डवरील बारकोडचा अभाव आणि गेल्या दहा वर्षांत रक्तपेढीचे ऑडिट झाले नाही.
सहाय्यक संचालकाचे पूर्णवेळ पद
बोर्डीकर यांनी सरकारच्या आगामी ठोस उपाययोजनांची माहिती दिली. रक्तपेढीच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी सहाय्यक संचालकाचे पूर्णवेळ पद निर्माण करण्यात येणार आहे.
तसेच, भविष्यात रक्ताचा गैरव्यवहार रोखण्यासाठी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था व अन्न आणि औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एक कडक एसओपी तयार करण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक रक्तपिशवीचे पारदर्शक ट्रॅकिंग करण्यासाठी 'क्यूआर कोड आधारित ट्रॅकिंग प्रणाली' लागू करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली.